४ ते ५ जणांसाठी
वेळ: केळफूल सोलायला - २० मिनीटे । भाजी शिजायला २० ते २५ मिनीटे
केळफूल कसे सोलावे आणि साफ करावे यासाठी रेसिपीच्या तळाला व्हिडीओ पहा.
साहित्य:
१ केळफूल
१/४ कप काळे चणे किंवा वाटाणे
फोडणीचे साहित्य: १ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, दोन चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून काळा मसाला
२ टिस्पून गूळ
आंबटपणासाठी चिंचेचा कोळ किंवा २ आमसुलं
चवीपुरते मिठ
१/४ कप ताजा खोवलेला नारळ
कृती:
१) १/४ कप काळे चणे पाण्यात ६ ते ७ भिजत ठेवावे.
२) केळफुल सोलून घ्यावे. आमसुली रंगाची साले काढून आतमध्ये असलेले कळ्यांचे गुच्छ वेगळे करून घ्यावे. हळूहळू आतमध्ये कोवळ्या कळ्या मिळत जातील. शेवटी शेवटी केळफुलात पांढरा दांडा लागला कि सोलणे थांबवावे.
३) प्रत्येक कळीमधला काळा दांडा आणि पारदर्शक पातळ पापुद्रा काढून टाकावा. सर्व कळ्या सोलून झाल्या कि बारीक चिरून घ्यावे. केळफुलातील पांढरा दांडाही बारीक चिरून घ्यावा.
४) खोलगट पातेल्यात मिठाचे पाणी तयार करावे. चिरलेले केळफुल मिठाच्या पाण्यात घालून ३ ते ४ तास ठेवून द्यावे म्हणजे केळफुलाचा चिक आणि काळपट राप निघून जाईल.
५) केळफुल हाताने घट्ट पिळून घ्यावे. केळफुल आणि चणे वेगवेगळ्या डब्यात ठेवून प्रेशरकूकरमध्ये ३ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे.
६) कढईत तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. शिजवलेले चणे आणि केळफुल फोडणीस घालावे. काळा मसाला, चवीपुरते मिठ आणि चिंचेचा कोळ घालून वाफ काढावी. भाजीला थोडा रस हवा असेल तर थोडे पाणी घालून शिजू द्यावे. गूळ घालून भाजी शिजू द्यावी.
भाजी शिजली कि खोवलेला नारळ घालून पोळीबरोबर सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment