साधारण १५ ते १८ मध्यम इडल्या
वेळ: साधारण ३५ ते ४० मिनीटे (मिश्रण बनविण्यास १५ मिनीटे + इडली वाफवणे व वाफ जिरणे २० ते २५ मिनीटे)

१ कप जाड रवा
१ टिस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, चिमूटभर हिंग, १/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ ते १ टिस्पून चणाडाळ, ४ ते ५ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून किसलेले आले
१/२ कप आंबट दही, घोटलेले
१/२ कप पाणी
चवीपुरते मिठ
१ टिस्पून इनो फ्रुट सॉल्ट (इनो सोडा)
कृती:
१) मध्यम आचेवर, कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग घालावे. आधी चणाडाळ घालून परतावे आणि थोडा रंग बदलला कि उडीद डाळ घालावी. उडीद डाळीचा रंग गुलाबीसर झाला कि कढीपत्ता पाने घालावीत आणि किसलेले आले घालावे. त्यावर १ कप जाड रवा घालून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर भाजावे.
२) भाजलेला रवा एका खोलगट भांड्यात काढून घ्यावा. दुसर्या भांड्यात घोटलेले दही आणि पाणी मिक्स करून त्याचे घट्टसर ताक बनवावे. रवा थोडा कोमट झाला कि त्यात हे ताक घालावे (टीप २). चवीपुरते मिठ घालून निट मिक्स करून घ्यावे. मिक्स करून १० मिनीटे तसेच ठेवावे. कंसिस्टन्सी नेहमीच्या इडली पिठाएवढीच असावी, खुप घट्ट किंवा पातळ नसावी.
३) इडली कूकरमध्ये (महत्त्वाची टीप ४) तळाला साधारण दिड इंच पाण्याची पातळी ठेवावी आणि पाणी गरम करण्यास ठेवावे. इडली पात्राला तेलाचा किंचीत हात लावून घ्यावा (टीप ३). मिश्रणात इनो सोडा घालून एकाच दिशेने मिक्स करावे आणि मिश्रण इडली पात्रात भरावे.
४) पाण्याला उकळी फुटली कि इडली स्टॅंड कूकरमध्ये ठेवून १२ ते १५ मिनीटे इडल्या वाफवाव्यात. ८ ते १० मिनीटे वाफ जिरल्यावर कूकर उघडून इडल्या चमच्याच्या टोकाने व्यवस्थित सोडवून घ्याव्यात.
टीप:
१) वरील पाककृती साधी मसाला इडलीची आहे. जर हवे असल्यास किसलेले गाजर, मटार अशा भाज्याही इडलीत घालू शकतो. वरील फोटोत दाखवल्याप्रमाणे भाज्या दिसायला हव्या असतील तर, इडली साच्यात आधी चिरलेल्या किंवा किसलेल्या भाज्या ठेवून वर इडलीचे पिठ घालावे. तसेच इडली पिठात डायरेक्ट भाज्या मिक्स करू शकतो, पण त्यामुळे इडल्यांचा रंग बदलतो.
२) रवा जर थोडा जास्त भाजला गेला असेल तर पाणी शोषून घेतल्याने मिश्रण घट्ट होते, तेव्हा कदाचित थोडे पाणी जास्त घालावे लागेल. मिश्रणाची कंसिस्टन्सी नेहमीच्या इडली पिठाएवढीच असावी, खुप घट्ट किंवा पातळ नसावी.
३) जर तुमच्या इडली पात्रात कमी इडल्या बनत असतील तर मिश्रण २ भागात विभागून घ्यावे. एक भागात १/२ टिस्पून सोडा घालून इडल्या वाफवून घ्याव्यात आणि नंतर उरलेल्या मिश्रणात सोडा घालून इडल्या बनवाव्यात. अशाप्रकारे २ बॅचेस कराव्यात. सर्व मिश्रणात एकदम सोडा घालू नये.
४) जर साधा कूकर वापरणार असाल तर कूकरच्या झाकणाची शिट्टी काढून ठेवावी.
No comments:
Post a Comment