मसाला डोसा - Masala Dosa

Masala Dosa in English

कृती वाचल्यावर त्याखालील टीपा जरून पाहा.

साहित्य :
डोसा
१ कप उडीद डाळ
अडीच ते पाऊणेतीन कप तांदूळ
१/२ कप चणा डाळ
१/२ टिस्पून मेथीदाणे
चवीपुरते मीठ
मसाला
२ उकडलेले मोठे बटाटे
१ मध्यम कांदा, उभा तापळ चिरून
१ टिस्पून उडीद डाळ
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून किसलेले आले
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद

कृती:
डोसा
१) उडीद डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुवून, ६-७ तास पाण्यात भिजत ठेवावे. उडीद डाळी बरोबरच मेथी दाणे आणि चणा डाळ भिजवावी.
२) नंतर त्यातील पाणी काढून टाकून मिक्सरवर वेगवेगळे बारीक वाटून घ्यावे. तांदूळ वाटताना त्यात १ टिस्पून साखर आणि १ टिस्पून मिठ घालावे. वाटलेली डाळ आणि तांदूळ एकत्र करावेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ करू नये. मिश्रण चांगले मिळून आले पाहिजे.
३) वरुन झाकण ठेवून १० ते १२ तास मिश्रण आंबू द्यावे. मिश्रण आंबले कि नंतर त्यात चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. याच पिठाच्या इडल्याही करता येतील. म्हणून मिश्रण घट्टसरच ठेवावे. डोसे बनवण्यासाठी आंबलेले पिठातील थोडे पिठ दुसर्‍या भांड्यात काढावे आणि किंचीत पाणी घालून पातळ करावे.
४) डोसे घालण्यासाठी नॉनस्टीक तवा वापरावा. आमटी वाढायच्या पळीने डोसे नीट घालता येतात.
मसाला/ बटाटा भाजी
१) शिजलेले बटाटे अगदी बारीक चिरून घ्यावे. कांदा बारीक उभा चिरून घ्यावा.
२) नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, आले घालून फोडणी करावी. त्यात थोडी उडीद डाळ घालावी. मिरच्या बारीक चिरून घालाव्या. कढीपत्ता घालावा.
३) मध्यम आचेवर कांदा परतावा. चिरलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
डोसे गरमागरम सांबार आणि चटणीबरोबर सर्व्ह करावे.


संबंधित पाककृती:
उडीपी सांबार रेसिपी
दाक्षिणात्य पद्धतीची नारळाची चटणी
हिरव्या रंगाची नारळाची चटणी

टीप:
१) आधी भाजी करून मग डोसे करावेत.
२) डोसे बनवताना तव्यावर तेल नसावे. जर डोसा-पिठ पसरवायच्या आधीच तेल घातले तर पिठ व्यवस्थित तव्यावर पसरत नाही. अशावेळी आधी डोसा पिठ घालून व्यवस्थित पातळ पसरवून घ्यावे. थोडा ब्राऊन रंग दिसला कि मग कडेने तेल सोडावे.
३) डोश्याला आतमध्ये थोडा शेजवान सॉस लावला तर मस्त टेस्ट येते.
४) मेथी दाण्यांमुळे फ्लेवर चांगला येतो. तसेच चणाडाळीमुळे थोडा कुरकूरीतपणा आणि किंचीत पिवळसर रंग येतो.
५) साखरेमुळे पिठ आंबण्याची क्रिया चांगली होते.
६) डोशाचे पिठ आंबण्यासाठी , पिठ बारीक करून उबदार जागी ठेवावे. थंड प्रदेशात डोशाचे पिठ आंबत नाही त्यामुळे ओव्हन २ ते ३ मिनीटे २७५ डीग्री Fahrenheit (१३५ डीग्री Celsius) वर प्रिहीट करावा. २ ते ३ मिनीटांनंतर ओव्हन बंद (स्विच ऑफ) करावा, तसेच जास्तवेळ गरम करू नये. आणि भिजवलेले पिठ झाकण ठेवून ओव्हनमध्ये साधारण १० तास ठेवावे. पिठ आत टाकल्यावर ओव्हनचे दार उघडू नये.

Labels:
Masala Dosa, Dosai recipe

No comments:

Post a Comment