वेळ: पूर्वतयारी-१० मिनीटे। पाकृसाठी-१५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

१/२ पौंड तोंडली (जवळपास पाव किलो)
१/४ कप तूर डाळ
१/२ टिस्पून मेथी दाणे
३ ते ४ लसणीच्या मोठ्या पाकळ्या, बारीक चिरून
फोडणीसाठी: १ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गोडा मसाला
१ टिस्पून गूळ
१/२ टिस्पून चिंचेचा घट्ट कोळ किंवा २ कोकमाचे तुकडे
चवीनुसार मिठ
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) तोंडली उभी चिरून मिठाच्या पाण्यात घालावी.
२) तूरडाळ धुवून १० मिनीटे पाण्यात भिजवून ठेवावी.
३) लहान कूकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण आणि मेथी दाणे फोडणीस घालावे. लसूण थोडी ब्राऊन होवू द्यावी. नंतर मोहोरी, हळद आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. तोंडल्यातील पाणी निथळून फोडणीस घालावी. एकदा परतून तूरडाळ घालावी व मिक्स करावे.
४) यामध्ये गूळ, गोडा मसाला, मिठ, आणि कोकम घालावे. थोडे पाणीसुद्धा घालावे (साधारण १/२ कप). मिक्स करून कूकरचे झाकण बंद करावे.
५) ३ शिट्ट्या करून गॅस बंद करावा. वाफ जिरू द्यावी. कूकर उघडून रश्श्याची चव पाहावी आणि तिखट-मिठ-मसाला लागेल तसे अडजस्ट करावे.
कोथिंबीरीने सजवून गरमच पोळीबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) पदार्थ शिजायला काही कूकरला जास्त शिट्ट्या लागतात तर काहींना कमी. ३ शिट्ट्यांमध्ये तोंडली शिजतीलच. आपल्याला डाळ शिजलेली हवी पण ती आख्खी राहिली पाहिजे, तीचे वरण होता कामा नये. म्हणून आपापल्या कूकरप्रमाणे किती शिट्ट्या कराव्या ते ठरवावे.
No comments:
Post a Comment