ukadpendi in English
वेळ: १५ मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप रवाळ कणिक
३ टेस्पून तेल
१/४ कप कांदा, बारीक चिरून
४ ते ५ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी: चिमटीभर मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद, २ सुक्या लाल मिरच्या
१/२ कप दही, घोटलेले
१/४ कप पाणी (टीप १)
चवीपुरते मिठ
कृती:
१) कढईत तेल गरम करावे. कणिक मध्यम आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावी (साधारण ५ ते ७ मिनीटे). भाजलेली कणिक लहान वाडग्यात काढून ठेवावी.
२) त्याच कढईत १ टेस्पून तेल घालावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल मिरच्या आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा घालून गुलाबीसर होईस्तोवर परतून घ्यावा. मिठ घालून मिक्स करावे.
३) भाजलेली कणिक घालून एक-दोन मिनीट मिक्स करावे. दही आणि पाणी मिक्स करावे आणि हे मिश्रण कढईत ओतावे. आणि पटापट मिक्स करावे. मिश्रणाचा गोळा तयार होईल. एकदम व्यवस्थित मिक्स करावे, गुठळी होवू देऊ नये. झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनीटे वाफ काढावी.
कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.
टीपा:
१) उकड पातळ किंवा घट्ट हवी असेल त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करावे. वरील कृतीमध्ये घट्ट उकड होईल एवढे पाण्याचे प्रमाण दिले आहे. पण उकड पातळ हवी असेल तर पाणी जास्त घालावे.
२) उकड ही कच्चं तेल घालून, चांगली मळून मग खातात. त्यासाठी घट्ट उकड करावी. गरमच असताना परातीत घेऊन थोडे तेल घालून लगेच मळावी. गरम मळताना चटका बसतो म्हणून उकड मळण्यासाठी लाकडी चकती मिळते ती वापरावी. ती जर नसेल तर खलबत्त्यातील खलायचे भांडे घ्यावे. त्याच्या तळाला तेल लावून त्याने मळावी. गरम गरम उकड सर्व्ह करावी.
३) लाल मिरची ऐवजी काहीजण हिरवी मिरची किंवा लाल तिखटही वापरतात.
४) कांदा हा ऐच्छिक आहे. पण चव चांगली येते कांद्यामुळे. तसेच कांद्याऐवजी लसूण वापरता येते. अधिक पौष्टीक बनवायची असल्यास मटार, गाजराचे तुकडे, भिजवलेली मूग-मटकीही घालू शकतो.
५) ही उकड तांदूळाची, बेसनाची, ज्वारीच्या पिठाची करता येते. पद्धत हीच फक्त पिठ वेगवेगळे वापरावे. किंवा मिश्र पिठाची सुद्धा उकड बनवता येते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment