Mango Pickle in English
वेळ: १५ मिनीटे
साधारण २ कप लोणचे
साहित्य:
२ कप कैरीच्या लहान फोडी (३ लहान कैर्या)
दिड टिस्पून मिठ
१/२ टिस्पून हिंग
१/४ ते १/२ टिस्पून तळलेल्या मेथी दाण्याची पावडर (स्टेप २)
१ टेस्पून मोहोरी पावडर
२ टेस्पून लाल तिखट
फोडणीसाठी: ४ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून हळद, १/४ टिस्पून हिंग
कृती:
१) कैर्या धुवून निट कोरड्या करून मगच त्याच्या फोडी कराव्यात. कैरीच्या फोडींना तासभर मिठ, लाल तिखट आणि हिंग लावून ठेवावे.
२) १२-१५ मेथी दाणे तेलात तळून घ्यावे. खलबत्त्यात कुटून बारीक पूड करावी.
३) कढल्यात तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, आणि हळद घालून फोडणी करावी. हि फोडणी एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या वाटीत काढून गार होवू द्यावी.
४) कैरीच्या फोडींमध्ये मेथीपूड, मोहोरी पूड आणि गार झालेली फोडणी घालून मिक्स करावे.
हे लोणचे लहान काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
टीपा:
१) जर खार जास्त हवा असेल तर थोडी मोहोरी पावडर घालावी.
२) मेथीची पावडर आधी १/४ टिस्पूनच टाकावी. २-३ तासांनी चव पाहून जर लागली तर अजून थोडी घालावी.
३) मिठाचे प्रमाणही आवडीनुसार कमी किंवा जास्त करता येईल.
४) मी २ टेस्पून लाल तिखटापैकी १/२ टेस्पून तिखट हे रंगाचे (काश्मिरी) लाल तिखट वापरले होते व उरलेले दिड टेस्पून साधं तिखट वापरलं होतं.
५) वरील लोणच्यात मोहोरी पावडर बरोबर थोडी मोहोरीची डाळ वापरल्यास लोणचे दिसायला आणि चवीलाही छान होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment