वाढणी: २ ते ३ जणांसाठी
वेळ: ४० मिनिटे
६ ते ८ छोटी वांगी
१/२ ते ३/४ कप खवलेला ओला नारळ
३ ते ४ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१ टीस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार
१ टीस्पून तिळ
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून धनेपूड
२ टीस्पून गोडा मसाला
२-३ टीस्पून किसलेला गूळ
३ टेस्पून चिंचेचा घट्ट कोळ
फोडणीचे साहित्य : ३ टेस्पून तेल, १/८ टीस्पून मोहोरी, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद,
चवीपुरते मीठ
१) सारणासाठी नारळ, शेंगदाण्याचा कूट, तिळ, गोडा मसाला, लाल मिरच्या एकत्र करावे. वाटल्यास मिक्सरमध्ये बारीक करावे म्हणजे सारण मिळून येईल.
२) चिंचेच्या कोळात किसलेला गूळ घालून मिक्स करावे. गूळ विरघळला कि ते मिश्रण सारणात घालावे. मिठ, जिरेपूड घालावी.
३) वांगी स्वच्छ धुवून त्याच्या दांड्या बघाव्यात, जर त्यावर काटे असतील तर काटे कापून टाकावे. वांग्याला वरून अधिक चिन्हासारखे काप द्यावेत, पण पूर्ण कापून फोडी करू नयेत. कारण आपल्याला वांग्यात सारण भरायचे आहे.
४) सारण वांग्यात भरावे. थोडे सारण ग्रेव्हीसाठी बाजूला काढून ठेवावे. कढईत ३ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, थोडे लाल तिखट घालून फोडणी करावी. बाजूला काढून ठेवलेली ग्रेव्ही घालावी, थोडे पाणी घालावे पाण्यात थोडे मिठ घालावे ज्यामुळे वांग्याच्या आत थोडे मिठ मुरेल. अलगदपणे भरलेली वांगी घालावीत. झाकण ठेवून मध्यम आचेवर उकळी काढावी. मधेमधे वांगी पलटावीत. तसेच गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालावे.
५) सुरीने वांगी शिजली आहेत कि नाही हे तपासून घ्यावे (टीप ४). वांगी नीट शिजली कि भाकरी किंवा पोळीबरोबर गरमागरम सर्व्ह करावीत.
टीप:
१) बाजारातून वांगी घेताना कोवळी, आकाराने छोटी वांगी घ्यावीत.
२) जर वांगी कढईत शिजवण्यासाठी वेळ नसेल तर कूकरमध्ये २ शिट्या कराव्यात. पण कूकरपेक्षा बाहेर शिजवलेली वांगी जास्त चविष्ट लागतात.
३) जर कांदा आवडत असेल तर फोडणीत बारीक चिरलेला थोडा कांदा परतावा. आणि मग वांगी घालावीत.
४) सुरी वांग्यात आरपार जाते पण कधीकधी मसाला वांग्यात आतपर्यंत मुरलेला नसतो. आणि मग मसाला न मुरल्याने वांगी तूरट लागतात. म्हणून एखादे वांगे अलगद उघडून पहावे. आतमध्ये जर थोडे पांढरट असेल तर अजून शिजू द्यावे.
No comments:
Post a Comment