मेक्सिकन पाककतींमध्ये बिन्स आणि राईसचा प्रामुख्याने वापर केला जातो. मेक्सिकन राईस आणि बिन्स बनवण्याची हि माझी पद्धत !! तेलाचा अजिबात वापर नसल्याने आणि भरपूर प्रमाणात भाज्या घातल्याने हि डिश पौष्टीक तसेच चविष्टही लागते. उसळ भाताला चेंज म्हणून हा नक्कीच चांगला पर्याय आहे.

साहित्य:
१ कप ब्लॅक बिन्स/ रेड बिन्स
१ लसूण पाकळी
१ तमालपत्र
१ ऑल स्पाईसचा गोळा
१ मध्यम कांदा बारीक उभा चिरलेला
१ मध्यम सिमला मिरची पातळ चिरून
१ चमचा व्हिनेगर (लिंबाचा रस)
दिड वाटी तांदूळ
मिठ
सजावटीसाठी: गाजराचे तुकडे, टोमॅटोच्या गोल चकत्या
कृती:
१) १ कप ब्लॅक बिन्स कोमट पाण्यात १०-१२ तास भिजत ठेवावे. न भिजलेल्या बिया काढून टाकाव्यात.
२) कूकरमध्ये ब्लॅक बिन्स शिजवून घ्याव्यात. खुप जास्त पाणी घालू नये, प्रमाणात पाणी घालावे. शिजवताना कूकरमध्ये मिठ, २ चमचे चिरलेला कांदा, २ चमचे सिमला मिरची, ठेचलेली लसूण पाकळी, तमालपत्र, ऑल स्पाईस हे सर्व जिन्नस घालावे. ३ शिट्ट्या कराव्यात. बिन्स मऊसर शिजवाव्यात त्याचबरोबर अख्ख्या राहातील याची पण काळजी घ्यावी.
३) तांदूळ मिठ न घालता शिजवून घ्यावा.
४) बिन्स पातेल्यात काढून घ्याव्यात. त्यातील लसूण, तमालपत्र, ऑल स्पाईस काढून टाकावा. गरज असल्यात थोडे पाणी घालावे. थोडावेळ मध्यम आचेवर उकळू द्यावे. शिजलेल्या बिन्सपैकी १/४ बिन्स ठेचून घ्याव्यात ज्यामुळे भाताबरोबर खाताना थोडी घट्टपणा येईल. १ चमचा व्हिनेगर घालावे. बिन्सला हवा तेवढा घट्टपणा आला कि त्यावर कांदा, सिमला मिरची घालून गरम गरम भाताबरोबर खावे. सजावटीसाठी गाजराचे तुकडे, टोमॅटोच्या गोल चकत्या वापराव्यात.
टीप:
१) रेड किंवा ब्लॅक बिन्स उपलब्धतेनुसार वापरता येतात.
२) आवडीनुसार पाती कांदा, कोबी पातळ चिरून घालू शकतो.
चकली
No comments:
Post a Comment