Showing posts with label A - E. Show all posts
Showing posts with label A - E. Show all posts

चॉकोलेट ब्राउनी सिझलर - Brownie Sizzler

Chocolate Brownie Sizzler in English

वेळ: १५ मिनिटे
४ जणांसाठी

chocolate brownie sizzler, sizzler recipesसाहित्य:
४ चॉकोलेट ब्राउनीज
चॉकोलेट सॉससाठी:- १ मिल्क चॉकोलेटचा बार, १/२ कप दुध
वेनिला आईसक्रीम
सिझलर प्लेट आणि त्याच्याखालील लाकडी ट्रे
ड्राय फ्रुट्स (अक्रोड आणि बदामाचे काप)

कृती:
१) चॉकोलेट सॉससाठी आधी चॉकोलेट वितळवण्याची गरज आहे. चॉकोलेटचे मध्यम तुकडे करून काचेच्या बोलमध्ये ठेवून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. एग बिटरने ढवळावे. गरजेप्रमाणे १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. प्रत्येकवेळी ढवळून पहावे. कारण मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ आतून बाहेर असे कुक होतो. गरजेपेक्षा जास्त मायक्रोवेव्ह केल्यास चॉकोलेट करपेल.
२) एकदा चॉकोलेट वितळले कि त्यात दुध घालून जोरात ढवळावे आणि गुठळ्या राहू देवू नयेत. थोडे थोडे दुध घालावे आणि मिक्स करावे. स्मूथ आणि चकचकीत असा सॉस बनेस्तोवर फेटावे. (सॉस जितका पातळ हवा असेल त्याप्रमाणे दुध जास्त-कमी करावे.)
३) ब्राउनिज जर गर असतील तर १० ते १५ सेकंद मायक्रोवेव्ह कराव्यात. म्हणजे थोड्या कोमट होतील.
४) सिझलर प्लेट गॅसवर गरम करावी. व्यवस्थित गरम होवू द्यात. पक्कडीने काळजीपूर्वक हि प्लेट लाकडी ट्रे मध्ये ठेवावी. मधोमध ब्राउनिज ठेवाव्यात. प्रत्येक ब्राउनीवर एकेक स्कूप वेनिला आईसक्रीम घालावे. आणि वरून चॉकोलेट सॉस घालावा. हा सॉस सिझलर प्लेटवर ओघळला पाहिजे. म्हणजे तो छान सिझल होईल. वरून अक्रोड बदामचे तुकडे घालून गर्निश करावे आणि लगेच सर्व्ह करावे.

कसे खावे? - चमच्यात आईसक्रीम + ब्राउनी + चॉकोलेट सॉस हे तीन्हीचे छोटे चंक्स घेउन खावे.

टीपा:
१) चॉकोलेट सॉस सिझलर प्लेटवर चिकटू नये म्हणून प्लेट गरम करताना त्यावर अल्युमिनम फॉइलचा तुकडा ठेवावा. आणि त्यावर मग ब्राउनी, आईसक्रीम आणि चॉकोलेट सॉस घालावा.
२) चॉकोलेट ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर तुम्ही नोटीस कराल कि बाहेरून चॉकोलेट वितळले नाहीये. पण ढवळल्यावर लक्षात येईल कि आतून चॉकोलेट मेल्ट व्हायला लागले आहे. म्हणून पहिली ३० सेकंद मायक्रोवेव्ह केल्यावर, ढवळून गरजेनुसार १०-१० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. आणि प्रत्येकवेळी ढवळून चेक करावे.
३) खाताना काळजीपूर्वक खावे. सिझलर प्लेटवर जो सॉस आहे तो प्रचंड गरम असतो. आणि जीभ पोळू शकते. म्हणून सॉस कितपत गरम आहे ते चेक करूनच खावे.

बीन स्प्राऊटस सलाड - Beans Sprouts salad

bean Sprouts Salad in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

Bean sprout salad, Salad recipes, chinese salad recipes, healthy salad, beans sprouts, bean sproutsसाहित्य:
१०० ते सव्वाशे ग्राम बीन स्प्राऊटस
६ ते ८ काकडीच्या पातळ चकत्या (काकडी सोलून घ्यावी. अर्धगोलाकार चकत्या कराव्या)
१/२ टीस्पून आलं, पातळ चकत्या
१ पाती कांदा, बारीक चिरून
१ लहान गाजर, मोठ्या भोकाच्या किसणीवर किसून घ्यावे
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१ टेस्पून तीळ, हलकेच भाजून
१/२ लिंबाचा रस१ टीस्पून सॉय सॉस
१ हिरवी मिरची, बारीक चिरून (ऐच्छिक)

कृती:
१) कढल्यात १ टेस्पून तेल गरम करून त्यात आलं कुरकुरीत करून घ्यावे. चमच्याने काढून ठेवावे. तेल सुद्धा एका वाटीत काढावे.
२) मोठ्या बोलमध्ये स्प्राऊटस, काकडी, पाती कांदा, गाजर, कोथिंबीर, आणि हिरवी मिरची एकत्र करावी. लिंबाचा रस, उरलेले तेल, सॉय सॉस आणि आलं घालून मिक्स करावे. तीळ घालून सजवावे. लगेच खावे.
टीपा:
१) स्प्राउट्स खूप नाजूक असतात. त्यामुळे जास्त वेळ मिक्स करू नये, मउसर होतात.

बेक्ड व्हेजिटेबल्स - Baked Vegeables

Baked vegetables in English



वेळ: ३० मिनिटे

वाढणी: ३ जणांसाठी



baked vegetables, bake vegetablesसाहित्य:

१ टेस्पून बटर

१ टीस्पून आले-लसूण-मिरची पेस्ट

१ कप कॉलीफ्लॉवरचे तुरे (मी ३/४ कप कॉलीफ्लॉवर आणि १/४ कप ब्रोकोली वापरली होती)

१/२ कप गाजर, लहान चौकोनी तुकडे

१/२ कप स्वीट कॉर्न (कॅनमधील)

१/४ कप फरसबी, १ सेमीच्या चकत्या

१/२ कप कांदा, बारीक चिरून

१/२ कप हिरवी भोपळी मिरची, लहान चौकोनी तुकडे

चवीपुरते मीठ

मसाले:- ३ चिमटी दालचिनी पावडर + २ चिमटी किंचीत भरड काळी मिरी + २ चिमटी वेलची पावडर

गरजेनुसार व्हाईट सॉस - रेसिपीसाठी इथे क्लिक करा

इतर साहित्य:

१/२ कप इटालीयन चीज ब्लेंड

१/२ कप चेडार चीज

१/४ कप ब्रेड क्रम्स (ऐच्छिक)

baked vegetables, white sauce, vegetables in white sauceकृती:

१) ओव्हन ३५० F वर प्रीहिट करण्यास ठेवावे.

२) पॅनमध्ये बटर गरम करावे. आले-लसूण-मिरची पेस्ट घालून काही सेकंद परतावे. कांदा घालून पारदर्शक होईस्तोवर परतावा. नंतर कॉलीफ्लॉवर, गाजर, फरसबी, आणि भोपळी मिरची घालून मिनिटभर परतावे. आता कॉर्न, मीठ आणि मसाल्याचे मिश्रण घालून नीट मिक्स करावे.

३) परतलेल्या भाज्या ओव्हनसेफ काचेच्या भांड्यात काढाव्यात. यामध्ये गरजेनुसार व्हाईट सॉस घालावा. व्हाईट सॉसने भाज्या छान कोट झाल्या पाहिजेत. एकूण चीजामधील थोडे चीज यात मिक्स करावे. आणि उरलेले चीज आणि ब्रेड क्रम्स वरून सारखे पेरावे.

४) ओव्हनचे तापमान ४०० F करावे. मिश्रण ८ ते १० मिनिटे किंवा चीजचा वरचा थर हलकासा ब्राऊन होईस्तोवर बेक करावे.

तयार बेक्ड व्हेजिटेबल्स ब्राऊन ब्रेड बरोबर सर्व्ह कराव्यात.



टीप:

१) आवडीप्रमाणे वेगळ्या भाज्याही वापरू शकतो (उदा. मटार, बटाटा)

अळूचं फदफदं - Aluchi Patal Bhaji

Aluchi Patal Bhaji in English



वेळ: २५ मिनिटे

वाढणी: ७ ते ८ मध्यम वाट्या (३ ते ४ जणांसाठी)



aluchi patal bhaji, aluvadiसाहित्य:

७ ते ८ अळूची मध्यम पाने

३ ते ४ टेस्पून शेंगदाणे

२ ते ३ टेस्पून चणा डाळ

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट

३ टेस्पून बेसन

१ टीस्पून चिंच

२ टीस्पून गोडा मसाला

२ टीस्पून गूळ

चवीपुरते मीठ



कृती:

१) शेंगदाणे आणि चणा डाळ किमान २ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर प्रेशर कुकरमध्ये १ किंवा २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.

२) चिंच १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावी. नंतर चिंच कुस्करून कोळ काढून घ्यावा.

३) अळूची पाने धुवून पुसून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. नंतर पानं बारीक चिरून घ्यावी. देठंही चिरून घ्यावीत.

४) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. १/२ टीस्पून मीठही घालावे. झाकण ठेवून ६ ते ७ मिनिटे शिजवावे. अळू जर कोरडा वाटत असेल तर थोडे पाणी शिंपडावे.

५) चिंचेचा कोळ घालून अजून ३-४ मिनिटे शिजू द्यावे. १/२ कप पाण्यात २ टेस्पून बेसन गुठळी न होता मिक्स करून घ्यावे.हे मिश्रण कढईत घालून ढवळावे.

६) यात शिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालावे. गरजेनुसार थोडे पाणी घालावे. (भाजी पळीवाढी करावी, प्रचंड घट्टही नको आणि पातळही नको.)

७) गोडा मसाला, गूळ, आणि लागल्यास मीठ घालून मिक्स करावे. बेसन शिजेस्तोवर उकळी काढावी.

गरमागरम तूप भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे.



टीपा:

१) अळूची पाने फोडणीला टाकून मग शिजवण्याऐवजी आधी प्रेशर कुकरमध्ये शिजवली तरीही चालतात. चिरलेली पाने शिजवून मग फोडणीस टाकावी.

२) पारंपारिक पद्धतीनुसार या भाजीत आंबट चुका आणि मुळा घालतात. आवडत असल्यास १/४ ते १/२ कप बारीक चिरलेला आंबट चुका अळूबरोबरच फोडणीला टाकावा. याला चव फार आंबट असते त्यामुळे जर आंबट चुका वापरणार असाल तर चिंच घालू नये. आणि घातल्यास आधी चव पाहून मगच घालावी. तसेच १/२ मुळा बारीक चिरून फोडणीस घालावा.

३) ओल्या नारळाच्या पातळ चकत्या शेंगादाण्याबरोबर घालाव्यात.

४) तिखट मीठ गुळ चिंच आणि गोड मसाला आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करावा. पण या भाजीला मसाले आणि आंबट गोडपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते.

भरली कारली - Bharli Karli

Stuffed Karela in English

वाढणी: २ ते ४ जणांसाठी
वेळ: २५ मिनिटे

stuffed karela, stuffed bitter gourd, karela recipe, karlyachi bhaji
साहित्य:
४ कोवळी कारली
तळण्यासाठी तेल
::सारण::
२ टेस्पून भाजलेले तिळ
२ टेस्पून भाजलेले बेसन (१ टेस्पून तेलावर भाजावे)
२ टेस्पून भाजलेले खोबरे
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर
१/२ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून बडिशेप
१ टिस्पून साखर
१ टिस्पून खसखस (ऐच्छिक)
चवीनुसार मिठ

कृती:
१) कारली धुवून घ्यावी. कारल्याची खरखरीत पाठ हलकेच किसणीने किसून प्लेन करून घ्यावी. प्रत्येक कारल्याला उभा छेद करून घ्यावा आणि बिया काढून साफ करावे. आतल्या बाजूने मिठ चोळून ठेवावे.
२) तिळ खोबरं एकत्र कुटून घ्यावे. त्यात धणेजिरेपूड, आमचूर, तिखट, साखर, भाजून कुटलेली खसखस, तेलावर भाजलेले बेसन आणि अगदी थोडे मिठ घालून मिक्स करावे (कारल्याला चोळलेले मिठ लक्षात ठेवावे)
३) मिश्रण कारल्यात भरून कारल्याला गच्च दोरा बांधावा आणि कारली कुरकूरीत तळावी.
वाढण्यापूर्वी दोरा काढून टाकावा. भरली कारली आमटी भाताबरोबर छान लागते. पोळीबरोबर खायचे झाल्यास बरोबर आमटी किवा तत्सम पातळ पदार्थ घ्यावा.

टीप:
१) कारली लहान पॅनमध्ये थोडे जास्त तेल घालून शालो फ्राय करता येतात. जास्त तेलाची फोडणी करून त्यात कारली परतून झाकावी. १० मिनीटे अधून मधून बाजू बदलावी आणि चमच्याने जरा प्रेस करत राहावे म्हणजे निट शिजले जाईल.
२) शक्यतो लहान व कोवळी कारली वापरावीत. लहान कारली लवकर शिजतात आणि वाढायला सोपी जातात. साधारण एक कारले एका व्यक्तीसाठी पुरेसे होते.

ब्रोकोली सूप - Cream of Broccoli Soup

Broccoli Soup in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

broccoli soup, creamy broccoli soup, thick soup recipe, healthy soups, soup recipesसाहित्य:
१ टेस्पून बटर
३०० ग्राम ब्रोकोलीचे तुरे (साधारण दीड कप लहान तुरे)
१ मध्यम कांदा, चिरलेला (३/४ कप)
१ मध्यम गाजर, चिरून
चवीनुसार मीठ आणि मिरपूड
१ टेस्पून मैदा
२ कप पाणी (टीप १)
१/४ कप क्रीम (मी हाफ अँड हाफ वापरले होते)
क्रूटॉन्स

कृती:
१) नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करावे. त्यात ब्रोकोली, कांदा, आणि गाजर घालावे. थोडे मीठ आणि मिरपूडसुद्धा घालावी. मध्यम आचेवर कांदा थोडा पारदर्शक होईस्तोवर परतावे. साधारण ५ ते ६ मिनिटे.
२) यामध्ये मैदा घालून दोनेक मिनिटे परतावे. पाणी घालून उकळी काढावी. मध्यम आचेवर १० मिनिटे उकळी काढावी.
३) क्रीम घालून ढवळावे. मिक्सरमध्ये प्युरी करावी. मीठ मिरपूड अड्जस्ट करावे. १ ते २ मिनिटे गरम करून सूप सर्व्ह करावे.
सर्व्ह करताना बरोबर तळलेले किंवा बेक केलेले ब्रेडचे तुकडे (क्रूटॉन्स) द्यावे.

टीप:
१) पाण्याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक किंवा चिकन स्टॉक वापरता येईल.

बेबी कॉर्न पकोडा - Baby Corn Pakoda

Baby Corn Pakoda in English

वेळ: १५ मिनिटे
३ जणांसाठी

baby corn snack, corn recipes, tea time snack, baby corn pakodaLinkसाहित्य:
१५ बेबी कॉर्न
३ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून हळद
१ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून आमचूर
चवीपुरते मिठ
तळणीसाठी तेल

कृती:
१) बेबी कॉर्न धुवून साफ कपड्याने पुसून घ्यावी.
२) कॉर्न फ्लोअर एका लहान वाडग्यात घ्यावे. त्यात सर्व मसाले आणि मिठ घालून मिक्स करावे. या मिश्रणात २ ते ३ टेस्पून पाणी घालून मध्यमसर भिजवावे.
३) कढईत तेल तापवावे. तेल व्यवस्थित तापले कि आच मध्यम करावी.
४) कॉर्न फ्लोअरच्या मिश्रणात ३ ते ४ बेबी कॉर्न घोळवून घ्यावी. गरम तेलात तळावीत. सोनेरी रंग येईस्तोवर तळावी. अशा प्रकारे सर्व बेबी कॉर्न तळून घ्यावीत.
टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावीत.

खरबूजाचा ज्युस - Cantaloupe Juice

Musk Melon (Kharbuja) Juice in English

A refreshing summer Drink - Musk Melon Juice

वेळ: १० मिनीटे
२ जणांसाठी
healthy juice recipe, cantaloupe juice, musk melon juice, fruit juice recipeसाहित्य:
२ ते अडीच कप खरबुजाच्या मध्यम फोडी (टीप)
१/२ कप संत्र्याचा ज्युस
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/२ टिस्पून किसलेले आले
किंचीत काळं मिठ
चवीपुरती साखर (ऐच्छिक)

कृती:
१) खरबुजाच्या फोडी, संत्र्याचा रस, लिंबू रस, आलं आणि थोडं काळं मिठ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
२) मोठ्या गाळण्याने किंवा स्वच्छ सुती कपड्याने व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळण्यामध्ये जो चोथा उरला असेल तो दाब देऊन निट पिळून घ्यावा.
३) तयार ज्युसची चव पाहावी. शक्यतो साखर घालू नये, पण लागल्यास १ ते २ चमचे घालावी.
ज्युस फ्रिजमध्ये गार करावा किंवा लगेच प्यायचा असल्यास बर्फाचे २-३ तुकडे घालून सर्व्ह करावा.

टीपा:
१) मी रेडीमेड संत्र्याचा ज्युस वापरला होता, त्यामुळे साखर घालावी लागली नाही. पण जर तुम्ही घरीच संत्र्याचा रस काढणार असाल तर चांगली रसदार संत्री वापरावी तसेच थोडी साखर घालावी.
२) खरबुज व्यवस्थित पिकलेले व गोड असावे म्हणजे चव छान लागेल. खरबुज कापताना आधी दोन भाग करावे, बिया काढून टाकाव्यात, सालं काढावीत आणि गराच्या फोडी कराव्यात.
३) जर घरी ज्युसर असेल तर तो वापरून छान ज्युस होईल.
४) आवडत असल्यास फ्रेश हर्ब्स जसे पुदीना, बेसिल वगैरेची २-४ पाने चुरडून घालू शकतो.

आम्रखंड - Amrakhand

!! अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

Amrakhand in English

वेळ: ३० मिनीटे
५ ते ६ जणांसाठी

amrakhand, sweets, shrikhand puri, Gudhi padvaसाहित्य:
३२ OZ चोबानी प्लेन ग्रिक योगर्ट किंवा १/२ किलो चक्का
३/४ ते १ कप आंब्याचा रस (मी कॅनमधील मँगो पल्प वापरला होता)
१ कप साखर
१/२ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून चारोळी
२ टेस्पून पिस्ता, जाडसर पूड करावी किंवा पातळ काप करावे

कृती:
१) ग्रिक योगर्ट सुती कपड्यात बांधून ८ ते १० तास त्यातील पाण्याचा अंश जाईस्तोवर लटकवून ठेवा. खाली एखादे पसरट भांडे ठेवा म्हणजे गळलेले पाणी त्यात जमा होईल.
२) तयार चक्का मोठ्या मिक्सिंग बोलमध्ये घ्यावा. त्यात १/२ कप आंब्याचा रस आणि १/२ कप साखर घाला. मिक्स करून १५ मिनीटे साखर विरघळण्यासाठी तसेच ठेवून द्या. परत चमच्याने घोटून चव पाहा. जर आंब्याचा फ्लेवर तसेच गोडपणा हवा असेल तर आवडीप्रमाणे आंब्याचा रस आणि साखर घाला. नंतर पूरणयंत्रातून हे मिश्रण फिरवून घ्या.
३) यात वेलचीपूड, चारोळी, पिस्ता घालून मिक्स करा. फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा आणि पुर्‍यांबरोबर सर्व्ह करा.

टीपा:
१) चक्क्यामध्ये एकाचवेळी सर्व आंब्याचा रस आणि साखर घालू नये. साखर चक्क्यात विरघळली कि चक्का थोडा पातळ होतो. तसेच आंब्याच्या रसाचा पातळपणा आहेच. म्हणून बेताबेताने आंबारस आणि साखर घालून चव पाहावी. आणि गरजेनुसार जिन्नस वाढवावे.
२) घरी काढलेला हापूस आंब्याचा रस रेडीमेड आमरसाऐवजी वापरू शकतो. हा रस पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करावा आणि गाळून घ्यावा. तसेच वरील प्रमाणापेक्षा जास्त साखर घालावी लागेल.
३) किंचीत भरड ठेवलेली साखर किंवा ग्रॅन्युलेटेड शुगर वापरल्यास कदाचित चक्का-साखर पूरणयंत्रातून बारीकही करावे लागणार नाही. फक्त एकदम बारीक पिठी साखर शक्यतो वापरू नये, श्रिखंडाचे टेक्श्चर बदलते.
४) वेलचीऐवजी जायफळ पूडसुद्धा वापरू शकतो.
५) पिस्त्याबरोबर बदाम काजू ही घातले तरी छान लागतात.

काश्मिरी दम आलू - Kashmiri Dum Aloo

Kashmiri Dum Aloo in English

वेळ: साधारण १ तास
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

aloo recipes, dum aloo, kashmiri dum aloo, recipe of aloo dum, aloo dum recipe, Indian curry recipes, flavorful curryसाहित्य:
१५ ते १८ लहान बटाटे (टीप)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१ कप टोमॅटो, बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून
२ टेस्पून काजूची पूड
४ टेस्पून दही, फेटून
१/२ टिस्पून सुंठ पावडर, १ टिस्पून बडीशेप पावडर, २ चिमटी लवंग पावडर
१ टिस्पून धणेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून गरम मसाला
२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप)
१ टिस्पून साधं लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
चवीपुरते मिठ
३ टेस्पून तेल
तळणासाठी तेल
Indian curry, butter masala curry, kashmiri dum aloo, dum aloo recipes, easy recipes, Indian restaurant, Restaurant style dum alooकृती:
१) बटाटे धुवून घ्यावेत. पातेल्यात मिठाचे पाणी उकळवावे. त्यात हे बटाटे सोडून १० मिनीटे झाकण ठेवून किंचीत शिजू द्यावे, जेणेकरून वरचे साल काढता येईल. १० मिनीटांनी पातेल्यातील गरम पाणी काढून गार पाणी सोडावे. आणि बटाट्याचे साल काढून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात बटाटे मिडीयम हाय आचेवर गोल्डन ब्राऊन तळून घ्यावे. खुप भरभर तळून काढू नये. नाहीतर बटाटे बाहेरून ब्राऊन होतात आणि आतून शिजत नाहीत. तळलेले बटाटे टिपकागदावर काढून घ्यावेत. काट्याने किंचीत टोचून घ्यावे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये घातल्यावर आतपर्यंत ग्रेव्ही मुरेल.
३) कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात आले लसूण परतावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट, काजूची पूड आणि टोमॅटो घालावा.मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.
४) त्याच कढईत १ चमचा तेल घालून हळद आणि काश्मिरी लाल तिखट घालावे. त्यावर कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. प्युरी उकळायला लागली कि त्यात सुंठ पावडर, बडीशेप पावडर, लवंग पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून मिक्स करावे.
५) दही घालण्यापूर्वी ५ मिनीटे आच एकदम कमी करावी. नंतर दही घालून भराभर मिक्स करावे म्हणजे दही फुटणार नाही. अंडं फेटायला जे beater वापरतो त्याने मिक्स करावे म्हणजे दही व्यवस्थित मिक्स होईल.
६) दही निट मिक्स झाले कि तळलेले बटाटे घालावेत आणि झाकण ठेवून १५ मिनीटे ग्रेव्ही आटू द्यावी. मधेमधे झाकण काढून ढवळावे म्हणजे ग्रेव्ही तळाला चिकटणार नाही.
गरजेइतका दाटपणा येऊ द्यावा. ग्रेव्ही भातावर किंवा पोळीबरोबर उत्तम लागते.

टीपा:
१) जर लहान बटाटे नसतील बटाट्याचे मोठे तुकडे करून वरीलप्रमाणेचे वापरता येतील.
२) काश्मिरी तिखट रंग येण्याकरता घातले आहे. या मिरची पावडरला तिखटपणा नसतो म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखटही घालावे.

दुधी हलवा - Dudhi Halwa

Dudhi Halwa in English

वेळ: साधारण ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

indian sweets, indian dessert recipe, easy dessert, quick dudhi halva, lauki halwa, bottle gourd halwaसाहित्य:
अडीच कप किसलेला दुधी भोपळा (सोलून बिया काढून)
१ टिस्पून तूप
पाऊण कप कंडेन्स मिल्क
१ टिस्पून चारोळी (३ तास कोमट पाण्यात भिजवावी)
१ टेस्पून बदामाचे काप, (बदाम भिजवून साल काढावे)
१ टेस्पून इतर ड्राय फ्रुट्स जसे काजू, पिस्ता, बेदाणे
१/४ टिस्पून वेलची पूड

कृती:

१) पॅन गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि किसलेला दुधी घालून परतावे. मिडीयम-हाय हिटवर परतत राहावे.
२) साधारण ५ ते ८ मिनीटांनी दुधीमधील पाणी निघून जाईल. आता किसलेल्या दुधीची एक काडी चावून पाहावी. जर कच्चेपणा वाटत असेल तर अजून काही मिनीटे शिजवावे.
३) दुधी शिजला कि कंडेन्स मिल्क घालावे आणि घट्ट्पणा येईस्तोवर परतत राहावे. सुकामेवा घालावा, वेलची पूड घालून मिक्स करावे. थोडावेळ परतून घ्यावे.
असा हा झटपट दुधी हलवा गार किंवा कोमट कसाही छान लागतो.

टीप:
१) कंडेन्स मिल्कचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे.
२) दुधी शिजवताना झाकण न ठेवता शिजवावा.

दुधी हलवा रेसिपी - दुध आणि साखर वापरून

आलू मेथी - Aloo Methi

Aloo Methi in English

वेळ: ३० ते ४० मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

साहित्य:
३ कप बारीक चिरलेली मेथीची पाने
१ मध्यम बटाटा, (सोलून मध्यम तुकडे करावेत)
१ लहान कांदा, बारीक चिरून (साधारण १/२ कप)
१ लहान टोमॅटो
फोडणीसाठी:- दिड टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद
२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
चवीपुरते मिठ

कृती:
१) टोमॅटो प्युरी - टोमॅटो काचेच्या वाडग्यात ठेवून त्यात टोमॅटो बुडतील इतपत पाणी घालावे. २ मिनीटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवावे. पाणी काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी आणि गाळून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग हळद, आणि मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात कांदा घालून ५० % शिजवावा. नंतर बटाट्याचे तुकडे घालावेत (टीप १). मिक्स करून झाकण ठेवावे आणि बटाटा शिजू द्यावा. बटाटा कढईला चिकटू नये म्हणून मधेमध्ये ढवळावे.
३) टोमॅटो प्युरी घालून मोठ्या आचेवर परतावे. जोवर टोमॅटो प्युरी चांगली आळत नाही तोवर परतत राहावे.
४) आता चिरलेली मेथी घालून बरोबर २-३ चिमटी मिठ घालावे. खुप जास्त मिठ घालू नये कारण मेथी शिजल्यावर आळते आणि एकदम कमी होते. मेथीसुद्धा मोठ्या आचेवर परतावी.
५) मेथीमधील पाण्याचा अंश निघून गेला कि आच कमी करून १-२ मिनीटे परतावे. चव पाहून लागल्यास मिठ घालावे.
भाजी गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावी

टीपा:
१) उकडलेला बटाटाही वापरू शकतो. फक्त बटाट्याच्या फोडी मेथी परतल्यावर घालाव्यात.
(फोडणी + कांदा पुर्ण शिजवणे + टोमॅटो प्युरी घालून आटवणे + मेथी व मिठ घालून मेथी + आळेस्तोवर परतावे + उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून काही मिनीटे परतावे)
२) हि भाजी कुठल्याही मसाल्याशिवाय छान लागते. तरी आवडीप्रमाणे मसाल्याचा वापर करू शकतो (धणेजिरेपूड, गरम मसाला)
३) कांद्याऐवजी लसूणही वापरू शकतो. १ टिस्पून लसूण पेस्ट वापरावी.

बेसिक एगलेस केक - Eggless sponge cake

Eggless Vanilla Cake in English

पूर्वतयारी - २५ ते ३० मिनीटे । बेकिंगसाठी - ३५ ते ४० मिनीटे
नग: १० लहान तुकडे

eggless cake, cake without egg, plain sponge cake recipeसाहित्य:
३/४ कप मैदा
२०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ कप + २ ते ४ चमचे)
१/४ कप बटर (मिठविरहित)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर
१/२ टिस्पून बेकिंग सोडा
१/२ टिस्पून वनिला इसेंस
१/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)

कृती:
१) प्रथम ओव्हन ३५० F (१८० C) ला प्रिहिट करत ठेवावे. तसेच केक टीनला (बेक करण्यासाठीचा डबा) आतून बटरचा हात लावून तयार ठेवावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे. जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे. हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. मिश्रण एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे. पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत.
४) नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगाचच मिश्रण फेटत राहू नये. गरजेनुसार मिश्रण एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे.
५) तयार मिश्रण केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा). केक टीन ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर ठेवावा आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. ३५ मिनीटे होईस्तोवर ओव्हन अजिबात उघडू नये. ओव्हन बेकिग करताना मधेमधे उघडल्यास ओव्हनचे तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण ३५ ते ३७ मिनीटांनंतर केकच्या मध्यभागी टूथपिकने किंवा सुरीने खालपर्यंत टोचून तशीच टूथपिक बाहेर काढावी. जर टूथपिकला ओलसट मिश्रण चिकटले नसेल तर केक बेक झाला असे समजावे. जर टूथपिकला ओलसट मिश्रण लागलेले असेल तर अजून थोडावेळ केक बेक करावा.
एकदा का केक बेक झाला कि ५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.


टीप:
१) केक टीनचे बरेच आकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात, जसे की बदाम, गोल, अंडाकृती, चौकोन इत्यादी. तसे केकटीन वापरून विविध आकारात आपण केक बनवू शकतो.
२) वरील प्रमाणातून २ ते ३ जणांसाठी केक बनवता येईल. जर जास्त प्रमाणात केक बनवायचा असेल तर दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेऊन केक बनवावा.
३) वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. मी ८" लांब x ३" रूद असा केकटीन वापरला होता. मिश्रण टीनमध्ये ओतल्यावर, तळापासून दिड ते २ इंच उंचीपर्यंत टीन भरला होता. वरील प्रमाणासाठी लहान केकटीन वापरावा. जर तुमच्याकडे मोठा केकटीन असेल तर मिश्रण दुप्पट घ्या.
४) प्लेन सोडा वॉटरच वापरावे. सोडा वॉटरमुळे केक हलका होतो. कोक, पेप्सी, जिंजर एल, लेमन सोडा वापरू नये. यामुळे केकच्या चवीत फरक पडेल.
५) सर्व साहित्य एकत्र करून झाल्यावर मिश्रणाची चव पाहावी. जर मिश्रण अगोड वाटले तर काही चमचे कंडेन्स मिल्क घालून मिक्स करावे आणि मगच बेक करावे.

भोपळा बटाटा भाजी - Bhopla Batata bhaji

Bhopla Batata Bhaji in English

वेळ: २० ते २५ मिनीटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

potato bhopla bhaji, fasting recipes, Indian fastingसाहित्य:
१ कप बटाट्याच्या चौकोनी फोडी
१ कप भोपळ्याच्या चौकोनी फोडी
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जिरे
२ ते ३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ टेस्पून ओलं खोबरं
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
साधारण १/४ कप ताक (टीप १)
चवीपुरते मिठ
कोथिंबीर बारीक चिरून

कृती:
१) कढईत तूप गरम करून जिरे फोडणीस टाकावे. नंतर हिरव्या परताव्या व त्यावर बटाट्याच्या फोडी घालून निट ढवळावे. ३-४ चमचे पाणी घालावे. २ वाफा काढाव्यात.
२) नंतर भोपळ्याच्या फोडी आणि मिठ घालून मिक्स करावे. वाफ काढावी. वाफ काढताना थोडा ताकाचा हबका मारावा. ओलं खोबरं घालून मिक्स करावे. भोपळा शिजेस्तोवर २-३ वाफा काढाव्या. शेंगदाण्याचे कूट घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
गरमा गरम भाजी पोळीबरोबर छान लागते तसेच उपासाला बदल म्हणून नुसती खायलाही चांगली वाटते.

टीप:
१) भाजी परतताना जर भाजीला ओलसरपणा कमी वाटला तेवढ्यापुरताच ताकाचा हबका मारावा.

ज्वारीची भाकरी - Jwarichi chi Bhakari

Jowar Bhakari in English

वेळ: २५ मिनीटे
वाढणी: ४ ते ५ मध्यम भाकर्‍या

bhakri, bhakari, millet roti, jwarichi bhakri, indian roti recipeसाहित्य:
२ कप ज्वारीचे पिठ
अंदाजे दिड ते दोन कप गरम पाणी
१ टेस्पून लोणी किंवा तूप
१/४ टिस्पून मिठ
१/२ ते पाऊण कप ज्वारीचे पिठ भाकरी थापायला किंवा लाटायला

भोगीची भाजी रेसिपी

कृती:
१) पातेल्यात पाणी गरम करून त्यात १ टेस्पून लोणी सोडावे. पाणी चांगले गरम झाले कि परातीत ज्वारीचे पिठ आणि मिठ घालून मिक्स करावे. त्यात पाणी बेताबेताने ओतावे. हळू हळू मिक्स करून मळावे. पिठ चांगले मळले गेले पाहिजे.
२) मळलेल्या पिठाचे ४ किंवा ५ गोळे करावे व लगेच भाकरी करण्यास घ्यावी.
३) तवा गरम झाला कि गॅस मिडीयम हाय हिटवर ठेवावा. मळलेल्या पिठाचा गोळा कोरड्या पिठात बुडवून हलक्या हाताने लाटावा (टीप १). लागल्यास अजून थोडे कोरडे पिठ घ्यावे. भाकरी मध्यमसर जाड ठेवावी.
४) भाकरी तव्यावर टाकावी. वरच्या बाजूने हाताने किंवा सुती कापडाने पाणी लावावे. पाणी सुकत आले कि भाकरी पलटावी व दुसर्‍या बाजूने भाजावी. (महत्त्वाची टीप २)
गरमागरम भाकरीवर लोणी घालून झुणका, पिठलं किंवा वांगं-बटाटा-कांदा अशा मिक्स रस्सा भाजीबरोबर छान लागते.

टीप:
१) भाकरी थापूनही करू शकतो. पिठाचा गोळा थोड्या जास्त पिठावर हलके हलके थापावा व भाकरी वाढवत न्यावी.
२) माझ्या घरी इलेक्ट्रिक स्टोव्ह कॉईल असल्याने आचेवर भाजता येत नाही. पण घरी विस्तवाची (flame) शेगडी असेल तर भाकरीची एक बाजू तव्यावर शेकावी. दुसर्‍या बाजूला लावलेले पाणी सुकले कि फुलके भाजायच्या चिमट्याने दुसरी बाजू थेट आचेवर ठेवावी. चिमट्याच्या मदतीने थोडी गोलगोल फिरवावी म्हणजे जळणार नाही.
३) भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि ज्वारी/बाजरीची भाकरी खातात. भाकरीवर तिळ लावून भाकरी भाजतात. भाकरी लाटताना/ थापताना वरून तिळ पेरावे आणि मग लाटावी/ थापावी.

भोगीची भाजी - Bhogi Bhaji

Bhogichi Bhaji in English

वेळ: पूर्वतयारी २० मिनीटे । पाकृसाठी: १५ ते २० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

bhogichi Bhaji, sankrant tilachya recipes, tilachya recipes, tilgul, tigulache ladu, tilache ladu, mix bhaji, makar sankrant, tilachya vadya, tilgulachya vadyaसाहित्य:
१ मोठा बटाटा, सोलून मध्यम फोडी (साधारण १ ते दिड कप)
१ मध्यम वांगे किंवा ३ ते ४ भरायची लहान वांगी (साधारण १ ते सव्वा कप मध्यम फोडी)
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप ओले चणे (मी फ्रोजन वापरले होते)
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे (२-३ तास भिजवणे)
१/४ कप पावट्याचे दाणे (ऐच्छिक)
६ तुकडे शेवगा शेंगेचे (३ इंचाचे तुकडे) (टीप)
फोडणीसाठी - २ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट,१/४ टिस्पून जिरे
३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून भाजलेल्या तिळाचा कूट
२ टिस्पून काळा मसाला - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून चिंचेचा दाट कोळ
१ ते दिड टेस्पून किसलेला गूळ
१/४ कप ओलं खोबरं
चवीपुरते मिठ

कृती:
१) पातेल्यात तेल गरम करून मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. प्रथम बटाटा, ओले चणे, पावटे, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
२) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
३) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि काळा मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचा कूट, खोबरं घालावे. लागल्यास चव पाहून मिठ घालावे. एक उकळी काढून भाकरीबरोबर गरमागरम भाजी सर्व्ह करावी.

टीप:
१) शेवग्याच्या शेंगा कोवळ्या घ्याव्यात नाहीतर त्या आतपर्यंत शिजत नाहीत. जर शेंगा जुन असतील तर त्या थोड्या वाफवून घ्याव्या.
२) भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. जर झटपट भाजी हवी असेल तर चणे, पावटे, शेंगा, शेंगदाणे कूकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे. परंतु भाज्या बाहेर शिजवल्यावर जो स्वाद येतो, तो कूकरमध्ये भाज्या शिजवल्यास येत नाही.

दलिया इडली - Daliya idli

Daliya Idli in English

वेळ: पूर्वतयारी- २० मिनीटे (दलिया भिजवणे वगळून) । पाकृसाठी- ३५ ते ४० मिनीटे
नग: १५ ते १७ मध्यम इडल्या

daliya idli, daliya recipe, daliya sheera, dalia idli recipe, marathi breakfast, indian breakfast recipe, healthy breakfastसाहित्य:
१ कप दलिया रवा
२ कप गरम पाणी
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, २ हिरव्या मिरच्या
४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ टिस्पून चणाडाळ
१ टिस्पून किसलेले आले
१/२ कप आंबट दही
चवीपुरते मिठ
१ टिस्पून इनो सोडा
इडली स्टॅंड
इडल्या वाफवायला इडली कूकर किंवा साधा मोठा कूकर

कृती:
१) दलिया गरम पाण्यात ४ तास भिजत घालावा. दलिया भिजल्यानंतर त्यातील अधिकचे पाणी काढून ठेवावे, पुर्ण पाणी काढले नाही तरी चालेल (टीप १). पाणी काढलेला दलिया मिक्सरमध्ये मध्यम वाटून घ्यावा.
२) कढल्यात तेल गरम करावे. त्यात आधी डाळी घालून गुलाबी होईस्तोवर परताव्या. नंतर मोहोरी, हिंग, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हि फोडणी वाटलेल्या दलियामध्ये घालावी.
३) यामध्ये दही, किसलेले आले आणि मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण तांदूळाच्या इडलीसाठी जे मिश्रण असते तितपतच दाट असावे. लागल्यास दलिया भिजवून जे पाणी ठेवले होते ते घालावे.
४) कूकरमध्ये तळाला अडीच ते ३ इंच पातळीपर्यंत पाणी घालावे. गॅस सुरू करावा. इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.
५) मिश्रणाचे दोन भाग करावे (टीप ६). एका भागात १/२ टिस्पून सोडा घालावा. मिक्स करून इडली पात्रात भरावे.
६) कूकरमधील पाण्याला उकळी आली कि इडली स्टॅंड कूकरमध्ये ठेवावा. वरून झाकण लावावे. साधा कूकर वापरत असाल तर झाकणावरची शिट्टी काढून ठेवावी.
७) १२ ते १५ मिनीटे वाफवावे. गॅस बंद करून ७-८ मिनीटे वाफ जिरू द्यावी.
८) नंतर इडल्या चमच्याने काढाव्यात (टीप २). परत कूकरमध्ये पाणी गरम करून वरीलप्रमाणेच इडल्यांची दुसरी बॅच करावी.

टीप:
१) दलिया भिजवल्यावर जर जास्त पाणी उरले तर ते फेकून न देता सांबार बनवायला वापरावे. मी वापरले होते, चवीत फरक पडत नाही.
२) या इडल्या अख्ख्या गव्हाच्या असल्याने थोड्या चिकट राहतात व जास्त फुलत नाही. म्हणून पूर्ण वाफ मुरल्यावरच इडल्या चमच्याने काढाव्यात. थंड झाल्या तरी मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकतो.
३) या इडल्या जरा सालट लागतात. म्हणून शक्यतो या इडल्या फक्त चटणीबरोबर खाऊ नयेत. जोडीला सांबारही बनवावे.
४) डायबेटीस पेशंट्स किंवा ज्यांना तांदूळ न खायचे पथ्य आहे त्यांच्यासाठी न्याहारीचा उत्तम उपाय.
५) यामध्ये आवडीनुसार भाज्याही घालू शकतो.
६) माझ्याकडे असलेला इडली स्टॅंड लहान आहे आणि त्यात नऊच इडल्या होतात. तुमच्याकडे जर १२ किंवा १६ कप्प्यांचा स्टॅंड असेल तर एकाच वेळी तुम्ही सर्व इडल्या करू शकता.

सिमला मिरची रस भाजी - Simla Mirchi batata Ras Bhaji

Simla Mirchi Rassa in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ३ जणांसाठी

bhopli mirchi, dhobli mirchi recipe, capsicum sabzi, bell pepper bhaji, Indian vegetables, capsicum curry, bhopli mirchi chi bhaji

साहित्य:
२ कप भोपळी मिरचीचे मोठे तुकडे
१ कप बटाट्याचे मध्यम तुकडे
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, २ चिमटी हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून गोडा मसाला
२ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टेस्पून ताजा नारळ
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ किंवा चवीनुसार
चवीपुरते मिठ

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. आधी बटाटे घालून मिक्स करावे. साधारण एक ते दोन मिनीट वाफ काढावी.
२) आता भोपळी मिरची घालून मिक्स करावे. अंदाजे ३/४ कप पाणी, गोडा मसाला, चिंचेचा कोळ आणि मिठ घालून मिक्स करावे. बटाटे शिजेस्तोवर शिजवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे. भोपळी मिरची एकदम मऊ होईस्तोवर शिजवू नये. अगदी किंचीत कच्ची राहू द्यावी.
३) बटाटा शिजला कि भाजीत गूळ, नारळ आणि शेंगदाणा कूट घालावा. छान ढवळावे आणि गरम गरम पोळीबरोबर सर्व्ह करावे.

लापशी रवा शिरा - Cracked wheat sheera

Daliya Sheera in English

वेळ: ३० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

हा शिरा बाळंतिणीसाठी करतात. दलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते. साखरेऐवजी गूळाचा वापर केला जातो.

lapashi rava, lapsi rava, cracked wheat, dalia shira, daliya sheera, healthy breakfast recipes, healthy recipes for breastfeeding moms, balantinicha aharसाहित्य:
१ कप दलिया किंवा लापशी रवा (Cracked Wheat)
३/४ कप किसलेला गूळ
२ टेस्पून तूप
१/२ कप ताजा खोवलेला नारळ
३ कप पाणी
१/४ कप गरम दूध
१/४ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर मिठ
३ टेस्पून काजू, बदाम, पिस्ता यांचे पातळ काप
१ टेस्पून बेदाणे
कृती:
१) २ टेस्पून तूप कढईत गरम करावे. त्यात लापशी रव खमंग भाजून घ्यावा. काजू, बदाम, पिस्त्याचे काप घालावे.
२) रवा भाजताना दुसर्‍या गॅसवर ३ कप पाणी गरम करावे. त्यात चिमूटभर मिठ घालावे.
३) रवा चांगला भाजला गेला कि त्यात गरम पाणी आणि दूध घालावे. निट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर २ वाफा काढाव्यात. ताजा नारळ घालून मिक्स करावे.
४) रवा शिजल्यावर किसलेला गूळ घालून ढवळावे. गूळ वितळला कि बेदाणे घालावे.
५) झाकण लावून मध्यम आचेवर वाफ काढावी. वेलचीपूड घालून मिक्स करावे.
गरम गरम सर्व्ह करावा.

टीप:
१) रवा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, नाहीतर शिरा निट बनत नाही.
२) पाणी घातल्यावर रवा चांगला शिजू द्यावा, गूळ घालायची घाई करू नये. नाहीतर रवा जरा कचवट राहण्याची शक्यता असते.
३) अजून गोड हवे असेल तर पाव कप गूळ अजून घालावा.
४) बाळंतिणीला शिरा वाढताना वरून थोडे तूप आणि ताजा नारळ घालून द्यावा. त्यामुळे चव छान लागते.

अळीवाची खीर - Alivachi Kheer

Alivachi Kheer in English

अळीव पौष्टिक असल्याने बाळंतिणीच्या तब्बेतीसाठी उत्तम असतात. प्रसुतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे, तसेच पचनक्रिया सुधारते. बलवर्धक असल्याने अशक्तपणासाठी अळीव खाल्लेला चालतो.
अळीव उष्ण असल्याने गरोदरपणात शक्यतो खाऊ नये.

वेळ: १० मिनीटे (अळीव भिजवलेले असतील तर)
वाढणी: १ ते दिड कप

alivachi kheer, pregnant women diet, pregnancy diet, healthy recipe, high calorie food, Indian post pregnancy diet recipes, postpartum recipes, lactating recipes, lactation boosting recipesसाहित्य:
१ कप दूध + अजून पाव कप दूध अळीव भिजवायला
१ ते दिड टेस्पून अळीव
३ ते ४ बदाम
१ खारीक (टीप २)
साखर चवीनुसार (साधारण दिड ते दोन टिस्पून)
चिमूटभर वेलचीपूड

कृती:
१) एका वाटीत अळीव पाव कप दुधात भिजत घालावेत (टीप ५). बदाम आणि खारीक दुसर्‍या वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत. (महत्त्वाची टिप १ पाहा). अळीव, खारीक आणि बदाम किमान ४ तास तरी भिजत ठेवावेत.
२) ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक बदामही चांगले भिजलेले असतील.
३) बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे.
४) दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे.

टीप:
१) जर उन्हाळा असेल तर दुध फ्रिजबाहेर खराब होते. अशावेळी अळीव, खारीक आणि बदाम पाण्यात भिजवावेत.
२) जर खारकेचे तुकडे नको असतील तर खारकांची पूड करून ठेवावी. खीर करताना उकळत्या दुधात थोडावेळ शिजू द्यावी.
३) बदाम, खारीक भिजवलेले पाणी तसेच बदामाची साले पौष्टिक असतात. सोललेली बदामाची साले चावायला जरा चामट लागतात तरीही सालांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. तेव्हा पाणी आणि साले फेकून देऊ नयेत, खाऊन टाकावीत.
४) आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणेसुद्धा खिरीत घालू शकतो.
५) अळीव भिजवताना चमच्याने निट ढवळावे. अळीव हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर/ दुधावर तरंगतात आणि कधीकधी निट भिजत नाहीत.

Labels:
Lactation Boosting Recipes, Aliv kheer, Balantinicha ahar, post pregnancy recipes