वेळ: वांग भाजण्यासाठी: भाजण्याच्या पद्धतीनुसार । पाकृसाठी वेळ: ५ ते १० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
१ मोठे वांगे
१ मोठा कांदा, बारीक चिरून (साधारण ३/४ ते १ कप)
३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १ चिमटी जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/८ टिस्पून हळद
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) वांगं भाजून घ्यावं.
i) गॅसवर: गॅसच्या शेगडीवर वांगं भाजण्यासाठी आधी वांग्याला किंचीत तेल चोळून घ्यावे आणि आचेवर भाजावे. मधेमधे वांगं फिरवावे म्हणजे सर्व ठिकाणी वांगं निट भाजले जाईल. (नोट- गॅसवर वांगं भाजताना वांग्यातील पाणी शेगडीवर पडून डाग पडतात. पण थोडे घासून स्वच्छ करता येते.)
ii) ओव्हनमध्ये: ओव्हन ४०० F वर प्रिहीट करावे. वांग्याला बाहेरून तेल लावून सुरीने किंवा काट्याने (Fork) काहीवेळा टोचावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये गुंडाळून ४५ ते ५० मिनीटे बेक करावे. (या पद्धतीने वांग्याचा आतील गर शिजतो पण थेट विस्तवावर भाजल्याने जो स्वाद येतो तो मात्र येत नाही.)
iii) बार्बेक्यु ग्रिलसुद्धा वांगं भाजायला वापरू शकतो.
iv) फायरप्लेस (टीप): ऐकायला मजेशीर वाटेल पण मी वांगं फायरप्लेसमध्ये भाजलं. वांग्याला तेल लावून काहीवेळा सुरीने किंवा काट्याने टोचून घ्यावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये व्यवस्थित गुंडाळून घ्यावे. फायरप्लेसमध्ये वरच्या बाजूस धूर बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकी असते ती प्रथम उघडावी. नंतर २ ते ३ जाडसर फांद्या फायरप्लेसमध्ये रचाव्यात. खाली १-२ नारळाच्या करवंट्या ठेवाव्यात. १-२ चमचे तेल फांद्यांवर शिंपडावे. जागा करून मधल्या जागी वांगं ठेवावे. आग पेटवावी. लागल्यास पेपर किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरून आग सुरू करावी. शेकोटी व्यवस्थित पेटल्यावर १० ते १५ मिनीटात वांग भाजलं जातं. वांगं भाजलं गेल्यावर अगदी सांभाळून पापड तळायच्या चिमट्याने बाहेर काढावे.
२) वांगं थोडं गार होवू द्यावं. सालं काढून शेंडी कापून टाकावी. आतील गर जाडसर कापून घ्यावा.
३) वांगं आणि कांदा एकत्र करावा. वांगं भाजल्यावर त्यातून जो रस निघतो तो फेकून देवू नये, तोही वापरावा.
४) कढईत तेल तापवून मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. मिरची परतावी. नंतर कांदा-वांग्याचे मिश्रण घालून २-३ मिनीटे परतावे. कोथिंबीरीने सजवून भाकरीबरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) वांगं भाजण्यासाठी बाजारात जो फायर स्टार्टर लॉग मिळतो तो वापरला नव्हता कारण तो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा रसायनं वापरतात ते माहीत नसतं. म्हणून झाडाच्या तुटलेल्या फांद्याच वापरल्या होत्या.
No comments:
Post a Comment