अळूचं फदफदं - Aluchi Patal Bhaji

Aluchi Patal Bhaji in English



वेळ: २५ मिनिटे

वाढणी: ७ ते ८ मध्यम वाट्या (३ ते ४ जणांसाठी)



aluchi patal bhaji, aluvadiसाहित्य:

७ ते ८ अळूची मध्यम पाने

३ ते ४ टेस्पून शेंगदाणे

२ ते ३ टेस्पून चणा डाळ

फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल तिखट

३ टेस्पून बेसन

१ टीस्पून चिंच

२ टीस्पून गोडा मसाला

२ टीस्पून गूळ

चवीपुरते मीठ



कृती:

१) शेंगदाणे आणि चणा डाळ किमान २ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर प्रेशर कुकरमध्ये १ किंवा २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावे.

२) चिंच १/२ कप पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवावी. नंतर चिंच कुस्करून कोळ काढून घ्यावा.

३) अळूची पाने धुवून पुसून घ्यावी. देठं वेगळी काढावीत आणि सोलून घ्यावीत. नंतर पानं बारीक चिरून घ्यावी. देठंही चिरून घ्यावीत.

४) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करून घ्यावी. यात चिरलेली अळूची पाने आणि देठं घालावीत. १/२ टीस्पून मीठही घालावे. झाकण ठेवून ६ ते ७ मिनिटे शिजवावे. अळू जर कोरडा वाटत असेल तर थोडे पाणी शिंपडावे.

५) चिंचेचा कोळ घालून अजून ३-४ मिनिटे शिजू द्यावे. १/२ कप पाण्यात २ टेस्पून बेसन गुठळी न होता मिक्स करून घ्यावे.हे मिश्रण कढईत घालून ढवळावे.

६) यात शिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे घालावे. गरजेनुसार थोडे पाणी घालावे. (भाजी पळीवाढी करावी, प्रचंड घट्टही नको आणि पातळही नको.)

७) गोडा मसाला, गूळ, आणि लागल्यास मीठ घालून मिक्स करावे. बेसन शिजेस्तोवर उकळी काढावी.

गरमागरम तूप भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावे.



टीपा:

१) अळूची पाने फोडणीला टाकून मग शिजवण्याऐवजी आधी प्रेशर कुकरमध्ये शिजवली तरीही चालतात. चिरलेली पाने शिजवून मग फोडणीस टाकावी.

२) पारंपारिक पद्धतीनुसार या भाजीत आंबट चुका आणि मुळा घालतात. आवडत असल्यास १/४ ते १/२ कप बारीक चिरलेला आंबट चुका अळूबरोबरच फोडणीला टाकावा. याला चव फार आंबट असते त्यामुळे जर आंबट चुका वापरणार असाल तर चिंच घालू नये. आणि घातल्यास आधी चव पाहून मगच घालावी. तसेच १/२ मुळा बारीक चिरून फोडणीस घालावा.

३) ओल्या नारळाच्या पातळ चकत्या शेंगादाण्याबरोबर घालाव्यात.

४) तिखट मीठ गुळ चिंच आणि गोड मसाला आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करावा. पण या भाजीला मसाले आणि आंबट गोडपणा थोडा पुढे असल्यास भाजी लज्जतदार लागते.

No comments:

Post a Comment