वाढणी: साधारण पाऊण किलो
साहित्य:
१/२ किलो धणे
१०० ग्राम जिरे
१०० ग्राम तिळ
१५० ग्राम सुके खोबरे
५ ग्राम काळी मिरी (साधारण १०-१२ मिरे)
५ ग्राम लवंगा (साधारण १०-१२ लवंगा)
५ ग्राम दालचिनी (४ इंचाच्या २ काड्या)
५ ग्राम तमालपत्र (५ ते ६ पाने)
१० ग्राम खडा हिंग
२ चमचे मिठ
१/४ कप तेल
कृती:
१) खोबरं किसून घ्यावे व कोरडेच खमंग भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे बाजूला एका ताटात काढून ठेवावे. तिळ आणि जिरे वेगवेगळे खमंग भाजून घ्यावे. दोन्ही भाजताना आच मध्यम ठेवावी म्हणजे खोबरे किंवा तिळ जळणार नाही.
२) कढईत तेल गरम करून १० ग्राम खडा हिंग तळून घ्यावे व एका वाडग्यात काढून ठेवावे.
३) नंतर त्याच तेलात लवंग, दालचिनी, तमालपत्र, आणि मिरी वेगवेगळे तळून घ्यावे. हे मसाले बाजूला काढून घ्यावे.
४) उरलेल्या तेलात धणे चांगले खमंग भाजून घ्यावे.
५) तळलेले जिन्नस (लवंग, दालचिनी, तमालपत्र, आणि मिरी) खलबत्त्यात कुटून घ्यावेत आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक करावेत. धणे मिक्सरमध्ये बारीक करावेत. हिंग पूड होईस्तोवर कुटावे. जिरे मिक्सरमध्ये बारीक करावे. बारीक केलेले हे सर्व जिन्नस बारीक चाळणीतून चाळून घ्यावे. चाळणीत उरलेला जाडसर भाग परत कुटून घ्यावा आणि चाळावा.
६) भाजलेले खोबरे आणि तिळ वेगवेगळे कुटून अथवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
७) चाळलेल्या मिश्रणात भाजून कुटलेले खोबरे व तिळ मिक्स करावे. मिठ घालून निट मिक्स करून घ्यावे. तयार मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
टीप:
१) हा मसाला आमटी, भरली वांगी, बाकरवडी, उसळी (चणा, मसूर, कुळीथ) मध्ये वापरल्यास खुप छान चव येते.
2) या मसाल्यात अजून काही मसाल्याचे पदार्थ जसे नागकेशर, दगडफूलही घालता येते.
Labels:
Bramhani Masala, Everyday Marathi Masala
No comments:
Post a Comment