शेवयांची खीर- Shevai Kheer

Shevai kheer in English

वेळ: ३५ मिनीटे
२ ते ३ जणांसाठी

shevayanchi kheer, sevai kheer, kheer recipe, vermicelli pudding
साहित्य:
१/४ कप शेवया
१/२ टिस्पून साजूक तूप
साडेतीन ते ४ कप दूध
१/४ कप साखर
३ वेलचींची पूड
२ टेस्पून पिस्ता, बदाम यांचे काप

कृती:
१) बदाम किमान २ ते ३ तास तरी भिजवावेत. साल काढून पातळ काप करावेत. पिस्त्याचेही बारीक तुकडे करावेत. वेलची सोलून वेलची दाण्यांची पूड करावी.
२) पातेले मंद आचेवर गरम करून त्यात तूप घालावे. तूप पातळ झाले कि त्यात शेवया घालून अगदी मंद आचेवर शेवया गुलाबीसर रंग येईस्तोवर भाजाव्यात. खुप जास्त ब्राऊन रंग येईस्तोवर भाजू नयेत, त्यामुळे खिरीची चव चांगली लागत नाही.
३) गुलाबी रंगावर भाजलेल्या शेवया बाजूला काढून ठेवाव्यात. त्याच पातेल्यात दूध गरम करावे. उकळी आल्यावर त्यात ३ टेस्पून किंवा चवीनुसार साखर, वेलचीपूड आणि भाजलेल्या शेवया घालाव्यात. मध्यम आचेवर शेवया शिजू द्याव्यात. मधेमधे ढवळावे नाहीतर दूध करपण्याची शक्यता असते. वाटल्यास पातेल्यावर झाकण ठेवावे म्हणजे शेवया शिजतील.
४) दूध चांगले आटले आणि शेवया व्यवस्थित शिजल्या कि गॅसवरून पातेले उतरवावे. बदाम, पिस्ते घालून सजवावे. गरम किंवा थंड करून सर्व्ह करावे.

टीप:
शेवया मोठ्या आचेवर भाजू नयेत त्यामुळे शेवया निट भाजल्या जाणार नाहीत.

No comments:

Post a Comment