साधारण १५ वड्या
वेळ: तयारीसाठी २० मिनीटे । पदार्थ बनविण्यासाठी २० मिनीटे
साहित्य:
अळू वड्यांसाठी असलेली अळूची पाने ४ किंवा ६
३/४ ते १ कप चणापिठ
१ टेस्पून तांदूळ पिठ
१/४ कप चिंच (घट्टसर कोळ)
२ टेस्पून किसलेला गूळ
१/४ टिस्पून हळद, २ टिस्पून लाल तिखट, एकेक टिस्पून धणे-जिरे पूड चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) चणापिठ, तांदूळ पिठ, चिंच कोळ, गूळ, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड, १ चमचा तेल, चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. घट्टसर करून घ्यावे. वाटल्यास थोडे पाणी घालावे. मिश्रण पातळ नसावे तसेच एकदम घट्ट गोळासुद्धा नसावा. मिश्रण जरा चिकटसर होईल. अळूच्या पानावर मिश्रणाचा पातळ थर पसरवता येईल इतपत मिश्रण दाट असावे.
२) पाने धुवून फडक्याने पुसून घ्या देठ कापून टाका. पान उलटे ठेवून त्यावर लाटणे फिरवावे. पानावर मिश्रणाचा पातळ लेयर लावावा. त्यावर दुसरे पान तसेच उलटे ठेवून त्यावर मिश्रण लावावे. तिन्ही पाने तशीच करावीत. खालच्या बाजूकडून लहान बाजूला घट्ट गुंडाळी करावी. गुंडाळताना थोडे थोडे मिश्रण लावावे. तयार उंडे मोदकाप्रमाणे वाफेवर उकडावेत.
गार झाले कि चकत्या कापून तळावेत किंवा शालो फ्राय करावेत.
सर्व्ह करताना अळूवडीवर कोथिंबीर, ओले खोबरे, आणि भाजलेले तिळ घालावेत.
टीप:
१) उकडलेल्या अळूवड्यांवर तेल, हिंग, आणि मोहोरीची फोडणी घालून तशाही खाऊ शकतो.
२) डीप फ्राय करण्याऐवजी जर अळूवड्या शालोफ्राय केल्या तर जास्त कुरकूरीत होतात.
३) एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अव्हेलेबल असलेल्या अळूच्या पानांपैकी मोठे पान आधी घ्या व त्याला तयार मिश्रण लावा. त्यावर मध्यम आकाराचे आणि सर्वात वर लहान अशाप्रकारे मांडणी करा. जर लहान पान बेस म्हणून घेतले तर रोल निट होणार नाही.
४) शक्यतो ३ पानांपेक्षा जास्त पाने एका रोलसाठी वापरू नका त्यामुळे रोल जाडीला जास्त होतो, तसेच घट्ट वळला जात नाही आणि अळूवडी तळताना तेलात सुटण्याचा संभव असतो.
५) रोल एकदम छान घट्ट बांधला गेला पाहिजे म्हणजे अळूवड्या तळल्यावर किंवा शालोफ्राय केल्यावर गोल आणि अख्ख्या राहतील.
Labels:
Indian Snack, Patra, Alu Vadi, Taro leaf rolls
No comments:
Post a Comment