Fried Pohe Chiwda in Marathi
वेळ: साधारण १ तास
वाढणी: १० ते १२ प्लेट
साहित्य:
३ कप जाडे पोहे
१/२ कप शेंगदाणे
१/४ कप सुक्या खोबर्याचे पातळ काप
१/४ कप काजूचे तुकडे
१/४ कप चणा डाळं
५ ते ६ सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून हळद
३ टिस्पून पिठी साखर
१/४ टिस्पून जिरेपूड
१ ते दिड कप तेल
कृती:
१) कढईत तेल गरम करा. तेलात शेंगदाणे, काजू, सुके खोबरे, कढीपत्ता, आणि चण्याचं डाळं वेगवेगळे तळून घ्या. एका परातीत हे सर्व काढून ठेवा.
२) उरलेल्या तेलात जाडे पोहे तळून घ्या. पोहे चांगले फुलले पाहिजेत पण रंग पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे.
३) तळलेले पोहे परातीमध्ये काढावे. यामध्ये हळद, तिखट, जिरेपूड, मिठ आणि साखर घालून मिक्स करावे. तळलेले शेंगदाणे, काजू, खोबरे आणि डाळंही मिक्स करावे.
तळलेल्या पोह्याचा चिवडा तयार!
टीप्स:
१) पोहे शेवटीच तळावेत. कारण पोह्यातील बारीक कण जळून तेलाच्या तळाशी राळ बसतो.
२) पोह्यातील बारीक कण तेलात जळतात आणि तळाला बसतात. म्हणून कढईत एक लहान मेटलची चाळणी किंवा मेटलचे गाळणे घेऊन त्यात पोहे ठेवावे आणि हि चाळणी गरम तेलात बुडवून पोहे फुलेस्तोवर तळावे. पोहे फुलले कि लगेच चाळणी वर काढावी. म्हणजे पोहे तेलात सर्वत्र पसरणार नाहीत. तसेच तेलात जळलेले पोह्यातील कण तळाशीच राहतात.
३) चवीनुसार हळद, साखर, जिरेपूड, मिठ आणि लाल तिखट यांचे प्रमाण अड्जस्ट करावे. जर सुक्या लाल मिरच्या वापरणार असाल तर लाल तिखट घालू नये.
४) चण्याचं डाळं म्हणजे भाजकं डाळं जे आपण साध्या चिवड्यात वापरतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment