Showing posts with label Diwali Faral. Show all posts
Showing posts with label Diwali Faral. Show all posts

रवा नारळाचे लाडू - Rava naralache ladu

Rava Coconut laddu in English

२२ ते २४ मध्यम लाडू
वेळ: ३० मिनीटे (मिश्रण आळायला लागणारा वेळ न धरता)

rava laddu, rava recipes, laddu recipes, rava naralache ladu, coconut laddu, semolina ladoo, semolina laddu, semolina coconut ladduसाहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप खवलेला ताजा नारळ
दिड कप साखर
१ कप पाणी
३ ते ४ टेस्पून तूप
१/२ टिस्पून वेलची पूड
२५ बेदाणे

कृती:
१) रवा मध्यम आचेवर ४ मिनीटे कोरडाच भाजावा. तळापासून सारखे ढवळत राहावे जेणेकरून रवा जळणार नाही. [रंग बदलेस्तोवर भाजू नये, अगदी हलकेच भाजावे. नंतर परत रवा भाजायचा आहे.]
२) भाजलेला रवा परातीत काढावा. त्यात खवलेला नारळ घालावा आणि मिसळावे. नारळातील ओलसरपणा रव्यात उतरेस्तोवर (१० मिनीटे) तसेच ठेवावे.
३) कढई गरम करून त्यात तूप घालावे. तूप वितळले कि रवा-नारळाचे मिश्रण घालावे. ८ ते १० मिनीटे मिश्रण मिडीयम-हाय फ्लेमवर भाजावे. सतत तळापासून ढवळावे. काही वेळाने रवा आणि तूपाचा छान वास येईल. रव्याचा रंग हलका बदामी होईस्तोवर भाजावे. भाजलेले मिश्रण परातीत काढून ठेवावे.
४) साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करावा. मिश्रण उकळायला लागले कि साधारण ३ ते ४ मिनीटांनी पाकाचा थेंब पहिले बोट आणि अंगठा यात पकडून उघडझाप करावी. जर एक तार दिसली कि पाक तयार आहे असे समजावे [हि तार अगदी सेकंदभरच दिसेल]. किंवा एकतारी पाक ओळखता येत नसेल. मिश्रण उकळायला लागले कि ३ ते ४ मिनीटात एकतारी पाक तयार होतो. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा.
५) लगेच पाक रवा-नारळाच्या मिश्रणात ओतावा. मिक्स करावे. मिश्रण सुरूवातीला पातळ दिसेल पण काहीवेळाने घट्ट होईल. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण आळेस्तोवर मधेमधे मिक्स करत राहावे.
मिश्रण आळले कि लाडू बनवावेत. प्रत्येक लाडवावर एकेक बेदाणा लावावा.

टीपा:
१) हे लाडू फार काळ टिकत नाहीत, जास्तीत जास्त ७-८ दिवस टिकतील. उष्ण आणि दमट हवामानात ३-४ दिवसच टिकतील. अशावेळी २-३ दिवसांनी लाडू फ्रिजमध्ये ठेवावे.
२) रवा साधारण ३ प्रकारचा मिळतो. जाड (coarse), बारीक (fine), एकदम बारीक (super fine). वरील रेसिपीसाठी बारीक रवा वापरावा. जाड रव्यामुळे लाडू चरचरीत लागतात. एकदम बारीक रवा पिठासारखाच दिसतो त्यामुळे रवा लाडूसाठी योग्य नसतो.
३) लाडूचे मिश्रण जर कोरडे झाले तर एकतारी पाक जरा जास्त आटल्याने दोन तारी किंवा तीन तारी झाला असावा. अशावेळी १/२ कप पाणी + ३ टेस्पून साखर असे मिश्रण उकळवावे. ३ ते ४ मिनीटे उकळवून पाक लाडू मिश्रणावर ओतावा. मिक्स करून मिश्रण आळले कि लाडू करावे.
४) आवडीनुसार सुका मेव्याचे तुकडे घालावे.
५) नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यावा. करवंटीकडील काळपट भाग घेऊ नये.

सोया व्हिट नानकटाई - Soya Wheat Nankatai

Nankatai in English

वेळ: ३० ते ४० मिनीटे
नग: २० ते २२ मध्यम नानकटाई

nanakatai, homemade nankatai, nankatai recipe, shortbread recipe, eggless biscuits, eggless cookiesसाहित्य:
८ टेस्पून अनसॉल्टेड बटर (१/२ कप)
६ टेस्पून पिठी साखर
१/२ कप गव्हाचे पिठ
१/२ कप सोयाबिन पिठ
१/४ टिस्पून बेकिंग पावडर
१/४ टिस्पून वेलची पावडर
२ टेस्पून पिस्त्याचे काप

कृती:
१) नानकटाई बनवण्यापूर्वी बटर २ तास फ्रिजबाहेर काढून ठेवावे म्हणजे एकदम मऊसर होईल. एका मध्यम आकाराच्या खोलगट ताटलीत बटर आणि साखर घ्यावी. आणि मिश्रण हलके होईस्तोवर जोरजोरात फेसावे.
२) ३५० डीग्री F (१७५ डीग्री सेल्सियस) वर ओव्हन प्रिहीट करावे.
३) बेकिंग ट्रे ला तूपाचा किंवा बटरचा हात लावून तयार ठेवावा. वरील प्रमाणासाठी साधारण २ ट्रे लागतील. एकच ट्रे असल्यास दोन विभागात नानकटाई बनवावी.
४) सोयाबिन पिठ, गव्हाचे पिठ, वेलची पावडर आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावी. चाळणीत जर पिठाचे गोळे अडकले असतील तर ते फोडून घ्यावेत. चाळलेले पिठ, बटर-साखरेच्या मिश्रणात घालावे आणि हाताने मळावे. व्यवस्थित गोळा तयार करावा. (कदाचित एखादा चमचा पिठ वाढवावे लागेल)
५) तयार गोळ्याचे साधारण २० ते २२ समान भाग करावे (१ इंच). प्रत्येक गोळा एकमेकापासून २ इंचाच्या अंतरावर ठेवावा. एका ट्रेमध्ये साधारण १२ ते १४ गोळे बसतील. प्रत्येक गोळ्यावर पेढ्याला लावतो तसे पिस्त्याचे काप लावून चेपावे.
६) ओव्हनच्या मधल्या रॅकमध्ये ट्रे ठेवावा व साधारण १२ ते १४ मिनीटे बेक करावे. बेक केल्यावर ट्रे बाहेर काढावा आणि गार होवू द्यावा. १५ मिनीटांनी खुसखूशीत अशा नानकटाई खाण्यासाठी तयार होतील.

टीपा:
१) मिठ नसलेले बटर वापरावे. बटर नसल्यास मऊसूत घरगूती लोणी वापरले तरी चालेल.
२) नानकटाईच्या मिश्रणात बदाम, काजू, पिस्त्याचे पातळ काप मिक्स केले तरीही छान चव येते.
३) नानकटाईसाठी मळलेला गोळा एकदम तुपकट नसावा. जर बटर जास्त वाटत असेल तर चमचाभर पिठ घालावे. कारण खुप तूपकट गोळा बेक केला तर नानकटाई एकदम बसक्या होतात. कणकेला मळतो इतपत गोळा घट्ट असला पाहिजे.

जाड पोह्यांचा चिवडा - Thick Poha Chivda

Fried Pohe Chiwda in Marathi

वेळ: साधारण १ तास
वाढणी: १० ते १२ प्लेट

chivada, chivda, chiwda, diwali faral, ladu karanjiसाहित्य:
३ कप जाडे पोहे
१/२ कप शेंगदाणे
१/४ कप सुक्या खोबर्‍याचे पातळ काप
१/४ कप काजूचे तुकडे
१/४ कप चणा डाळं
५ ते ६ सुक्या मिरच्या किंवा १ टिस्पून लाल तिखट
५ ते ६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून हळद
३ टिस्पून पिठी साखर
१/४ टिस्पून जिरेपूड
१ ते दिड कप तेल

कृती:
१) कढईत तेल गरम करा. तेलात शेंगदाणे, काजू, सुके खोबरे, कढीपत्ता, आणि चण्याचं डाळं वेगवेगळे तळून घ्या. एका परातीत हे सर्व काढून ठेवा.
२) उरलेल्या तेलात जाडे पोहे तळून घ्या. पोहे चांगले फुलले पाहिजेत पण रंग पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे.
३) तळलेले पोहे परातीमध्ये काढावे. यामध्ये हळद, तिखट, जिरेपूड, मिठ आणि साखर घालून मिक्स करावे. तळलेले शेंगदाणे, काजू, खोबरे आणि डाळंही मिक्स करावे.
तळलेल्या पोह्याचा चिवडा तयार!

टीप्स:
१) पोहे शेवटीच तळावेत. कारण पोह्यातील बारीक कण जळून तेलाच्या तळाशी राळ बसतो.
२) पोह्यातील बारीक कण तेलात जळतात आणि तळाला बसतात. म्हणून कढईत एक लहान मेटलची चाळणी किंवा मेटलचे गाळणे घेऊन त्यात पोहे ठेवावे आणि हि चाळणी गरम तेलात बुडवून पोहे फुलेस्तोवर तळावे. पोहे फुलले कि लगेच चाळणी वर काढावी. म्हणजे पोहे तेलात सर्वत्र पसरणार नाहीत. तसेच तेलात जळलेले पोह्यातील कण तळाशीच राहतात.
३) चवीनुसार हळद, साखर, जिरेपूड, मिठ आणि लाल तिखट यांचे प्रमाण अड्जस्ट करावे. जर सुक्या लाल मिरच्या वापरणार असाल तर लाल तिखट घालू नये.
४) चण्याचं डाळं म्हणजे भाजकं डाळं जे आपण साध्या चिवड्यात वापरतो.

कडबोळी भाजणी - Kadboli Bhajani

Kadboli Flour in English


साधारण १ ते दीड किलो भाजणी

साहित्य:
१ किलो तांदूळ
२०० ग्राम हरभरे
२०० ग्राम उडीद डाळ, सालासकट
१ कप गहू
५० ग्राम धणे
२ टेस्पून जिरे

कृती:
१) वरील सर्व साहित्य वेगवेगळे, मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावेत.
२) भाजून गार झाले कि एकत्र करून सरसरीत दळून आणावे.

कडबोळी रेसिपी इथे क्लिक करा.

टिप:
१) उडीद डाळ सालासकट घ्यावी किंवा अख्खे (सालासकट) उडीद घ्यावे. यामुळे खमंग पणा वाढतो.
२) साहित्य खमंग भाजताना खूप जास्त काळपट होणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे पदार्थ कडवट लागतो.
३) जर घरी दळण यंत्र असेल तर त्यावर किंचीत सरसरीत दळा. किंवा जवळपासच्या गिरणीत दळायला द्या.

कडबोळी - Kadboli

Kadboli in English

कडबोळी भाजणीची रेसिपी येत्या गुरूवारच्या पोस्टमध्ये नक्की पाहा!

नग: ३५ ते ४० कडबोळ्या
वेळ: ४० मिनीटे

chakali, kadboli, diwali faral, ladoo, ladu, chiwda, chivda, maharashtrian diwali faralसाहित्य:
सव्वा कप कडबोळीची भाजणी - कडबोळी भाजणीची रेसिपी
सव्वा कप पाणी
१ टिस्पून तिळ
१ टिस्पून ओवा
दिड टिस्पून तिखट
१/४ टिस्पून हिंग
१ टिस्पून मिठ किंवा चवीनुसार
१ टिस्पून तेल
तळण्यासाठी तेल

कृती:
१) सव्वा कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात तिळ, ओवा, तिखट, हिंग, मिठ, तेल घालून ढवळावे.
२) पाण्याला उकळी आली कि गॅस बंद करून त्यात कडबोळीची भाजणी घालावी. चमच्याने मिकस करावे. वरती झाकण ठेवून ५ ते ८ मिनीटे वाफ मुरू द्यावी.
३) नंतर कोमट पाण्याचा हात घेऊन पिठ मऊसर मळून घ्यावे.
४) पिठाचा एक ते दिड इंचाचा गोळा घेऊन त्याची एकसंध लड वळावी (साधारण रूंदी १ सेमी) आणि लडीच्या एका टोकाभोवती उरलेली लड गोलाकार फिरवून कडबोळी बनवावी.
५) तळणीसाठी तेल गरम करून कडबोळ्या तळून घ्याव्यात (टीप).

टीप:
१) कडबोळ्या तळताना आच मिडीयम आणि हायच्या मधे असावी. कडबोळी तळताना तेलाचे बुडबूडे कमी होवून कडबोळी खाली बसायला लागली कि ती निट तळली गेली आहे हे समजावे. तसेच खुप काळी होईस्तोवर तळू नये चव कडसर लागते.

पाकातल्या पुर्‍या - Pakatlya Purya

Pakatlya Purya in English

वेळ: २५ ते ३० मिनीटे
नग: २५ ते ३० मध्यम पुर्‍या

diwali faral, divali recipes, shankarpale, chirote, chakali, pakatlya puryaसाहित्य:
१ कप मैदा
१/२ कप बारीक रवा
१ टेस्पून तेल, मोहनासाठी
चिमूटभर मिठ
दही (टीप)
पाक करण्यासाठी:- दिड कप साखर आणि १/२ ते पाऊण कप पाणी
१/२ टिस्पून वेलची पावडर
४ केशराच्या काड्या
तळण्यासाठी तूप (टीप)

कृती:
१) मैदा आणि बारीक रवा एकत्र करून १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चिमूटभर मिठ घालावे. दही घालून घट्ट मळून घ्यावे. १ तास तसेच झाकून ठेवावे.
२) साखर आणि पाणी एकत्र करून २ तारी पाक करावा. केशर थोडे गरम करून किंचीत साखरेबरोबर कुटून पाकात घालावे. वेलची पावडर घालून मिक्स करावे.
३) जेवढी मोठी पुरी हवी असेल त्यायोग्य पुरीसाठी समान आकाराच्या लाट्या बनवाव्यात.
४) तूप गरम करून पुर्‍या तळून घ्याव्यात. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात पुर्‍या टाकाव्यात. काही मिनीटे मुरू द्याव्यात. नंतर ताटात पाघळवत ठेवाव्यात.
सजावटीसाठी भरडसर वाटलेला पिस्ता पेरावा. या पुर्‍या पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.

टीप:
१) दही वापरताना आंबट दही घ्यावे. तसेच जर दही वापरायचे नसेल तर साध्या पाण्याने पिठ भिजवावे आणि पाकामध्ये लिंबाचा रस घालावा म्हणजे गरजेचा आंबटपणा पुर्‍यांना येतो.
२) तूपाऐवजी तेलात पुर्‍या तळल्या तरी चालतात. पण तुपामुळे पुर्‍यांना खुप छान स्वाद येतो.

कणकेच्या चकल्या - Kankechya Chaklya

Wheat Flour Chakli in English

साधारण १५ मध्यम चकल्या
वेळ: ४० मिनीटे

wheat flour chakli, kankechya chaklya, chakali recipeसाहित्य:
१ कप गव्हाचे पिठ
१ टेस्पून दही
१/२ टिस्पून ओवा
१/२ टिस्पून तिळ
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ ते दिड टिस्पून लाल तिखट
चवीनुसार मिठ
पिठ भिजवायला पाणी
तळायला तेल
जाड कापड (साधारण १ फुट)
बारीक भोकांची किसणी

कृती:
१) जाड कापडात गव्हाचे पिठ घट्ट बांधून घ्यावे. प्रेशर कूकरमध्ये तळाला २ ते ३ भांडी पाणी घालावे. लोखंडी तिपाई किंवा कूकरमधील भांडे ठेवून त्यावर एक स्टीलची चाळणी ठेवावी. त्यात गव्हाचे पिठ बांधलेली कापडाची पुरचूंडी ठेवावी. २ ते ३ शिट्ट्या कराव्यात आणि गॅस बंद करावा.
२) प्रेशर कूकर गार झाल्यावर त्यातील पुरचूंडी उघडून त्यात तयार झालेला पिठाचा घट्ट गोळा काढून घ्यावा. बारीक किसणीवर किसून घ्यावा. जर छोट्या गुठळ्या राहिल्या असतील तर हाताने फोडून घ्याव्यात किंवा बारीक चाळणीने चाळून जाडसर गोळे फोडून घ्यावेत. पिठ एकदम बारीक असावे.
३) या पिठात दही, ओवा, तिळ, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट आणि मिठ घालावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे.
४) चकलीच्या सोर्‍याला आतून तेलाचा हात लावावा. आणि १ चकली पाडून बघावी. जर चकली तुटत असेल तर अगदी थोडे पाणी घालून पिठ मळून घ्यावे.
५) तेल गरम करून मिडीयम-हाय गॅसवर चकल्या तळून घ्याव्यात. थोडावेळ जाळीवर गार होण्यासाठी ठेवाव्यात आणि मग लगेच हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

Labels:
Wheat flour chakli, kankechya chaklya

रवा बेसन लाडू - Rava Besan Ladu

Rava Besan Ladu in English

१२ ते १५ लाडू, मध्यम आकाराचे
वेळ: ३० ते ४० मिनीटे (पाक मुरायला कमीतकमी २० मिनीटे आणि जास्तीत जास्त २ तासही लागू शकतात)

rava besan ladu, Maharashtrian Rava besan ladu, Ladoo recipe, diwali faralसाहित्य:
१ कप बारीक रवा
१/२ कप बेसन
४ टेस्पून तूप
१ कप साखर
१/२ कप पाणी
१/२ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजूचे पातळ काप

कृती:
१) बारीक रवा मध्यम आचेवर कोरडाच भाजावा. गुलाबीसर रंग येऊ द्यावा. तसेच भाजताना सतत कालथ्याने उलथत राहावा. मोठ्या आचेवर भाजल्यास रंग पटकन येईल पण रवा कच्चाच राहिल.
२) रवा भाजला कि परातीत काढून ठेवावा. त्याच कढईत तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे. बदाम काजूचे काप घालावे.
३) दुसर्‍या पातेल्यात १ कप साखर आणि १/२ कप पाणी घालून एकतारी पाक करावा. एकतारी पाक करण्यासाठी साखर पाणी एकत्र करावा एक उकळी येऊ द्यावी. उकळी आली कि मिश्रण फेसाळेल आणि फेस कमी झाला कि अर्ध्या मिनीटात लगेच गॅस बंद करावा आणि हा पाक रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घालावा. कालथ्याने ढवळावे आणि झाकून ठेवावे. १५-२० मिनीटांनी मिश्रण ढवळावे. वेलचीपूड घालावी. हळू हळू मिश्रण आळेल आणि लाडू वळण्याइतपत घट्ट झाले कि लगेच लाडू वळावेत.

टीप:
१) पाक व्यवस्थित जमला पाहिजे, पाक गरजेपेक्षा थोडाजरी दाट झाला कि मिश्रण कोरडे होते. मी लाडू बनवले तेव्हा मिश्रण पटकन आळले आणि जरा कोरडे झाले तेव्हा मी थोडे दुध घालून लाडू वळले. छान झाले आणि ८ दिवस टिकलेसुद्धा. जर दमट हवेच्या ठिकाणी राहात असाल आणि लाडू वळताना दुध घातले असेल तर शक्यतो लाडू बनवल्यावर दुसर्‍या दिवशी फ्रिजमध्ये ठेवावेत.

बेसन लाडू (बिनपाकाचे) - Besan Ladu

Besan Ladu in English

१० ते १२ मध्यम आकाराचे लाडू
वेळ: साधारण १ तास (प्रमाण दुप्पट केल्यास ३० ते ४० मिनीटे अधिक)

besan ladu, besan ladoo, Besan laddu, diwali faralबेसन लाडू, साखरेचा पाक करूनही बनवता येतात, त्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा - पाकातले बेसन लाडू

साहित्य:

दिड कप बेसन
साधारण पाऊण कप तूप (वितळवलेले)
३/४ कप पिठी साखर (किंवा गरजेनुसार)
१/२ टिस्पून वेलचीपूड
३ टेस्पून दूध
बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे आवडीनुसार

besanache ladu, marathi diwali faral, besan ke laddu, laddu recipeकृती:
१) बेसन तूपामध्ये मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे (साधारण ३५ ते ४० मिनीटे). भाजताना सारखे ढवळत राहावे. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि साधारण ५ ते ७ मिनीटांत पातळ व्हायला लागेल. पातळ झाले तरी काळजी करू नये.
२) दुध न घालता:
बेसन छान बदामी रंगावर भाजले गेले कि गॅस बंद करावा. बेसन पूर्ण गार होवू द्यावे. साधारण २ तास तरी साखर घालू नये. नंतर त्यात आवडीप्रमाणे सुकामेवा, वेलचीपूड आणि गरजेनुसार साखर घालावी. निट मिक्स करून लाडू वळावेत. कधी कधी लाडूचे पिठ पातळ झाल्यासारखे वाटते आणि लाडू बसतात. पण काही तासांनी लाडू वळले कि छान होतात.

तरीही बेसन गरम असतानाच थोडे दुध घातले तर शक्यतो लाडू चुकत नाहीत. त्याची कृती पुढीलप्रमाणे.
२) दुध घालून:
बेसन व्यवस्थित भाजले गेले आणि खमंग वास आला कि गॅस बंद करावा आणि दुधाचा हबका मारावा. यामुळे बेसन चांगले फुलेल (आधी फसफसेल) आणि घट्टसर होईल. हे बेसन लगेच दुसर्‍या भांड्यात काढून ठेवावे. साधारण २० मिनीटांनी यात सुका मेवा, वेलचीपूड आणि साखर घालून हलके मळून ठेवून द्यावे. गार झाले कि लाडू वळावेत.

टिप:
१) हे लाडू १५ ते २० दिवस सहज टिकतात. फक्त बेसन गरम असतानाच दुधाचा हबका मारावा.

Labels:
Besan Ladu, Besanache ladoo

बेक्ड करंजी - Baked Karanji

Dryfruit Karanji (baked) in English

३० ते ३५ लहान करंज्या
वेळ: ५० मिनीटे (सारण तयार असल्यास)

Bake karanji, bake kelelya karanjya, dry fruit karanji, gujia, gujiya, Diwali maharashtrian karanji, diwali faralसंबंधित पाककृती:-
ओल्या नारळाच्या करंज्या **** दिवाळी फराळ **** मेथी शंकरपाळे **** मटार बटाटा करंजी

साहित्य:
२ कप मैदा
३ टेस्पून तूप, पातळ
चिमूटभर मिठ
ड्रायफ्रुटचे सारण
दुध, पिठ भिजवण्यापुरते

स्टेप बाय स्टेप फोटोनुसार प्रेझेंटेशनसाठी इथे क्लिक करा.

कृती:
१) मैदयात तूप आणि मिठ घालून तूप सर्व मैद्याला चोळून घ्यावे. दुध घालून मध्यमसर कणिक मळून घ्यावी. १५ मिनीटे झाकून ठेवावी.
२) कणिक २५ ते ३० समान छोटे गोळे करून घ्यावे. गोळा साधारण १ इंचाचा तरी असावा.
३) गोळा लाटून गोल पुरी करावी. मध्यभागी १ टेस्पून ड्रायफ्रुटचे सारण घालावे. अर्ध्या गोलाच्या कडेवर थोडे पाणी लावावे. दुसरी बाजू दुमडून पाणी लावलेल्या कडेवर आणावी. कडा चिकटवून घ्याव्यात. काटा-चमच्यातील काट्याने कडेवर डिझाईन बनवावे आणि कातणाने १/२ सेमी जागा सोडून कड कापावी. कापलेली पट्टी पुन्हा कणकेत मिक्स करावी किंवा ३ ते ४ करंज्या केल्यावर त्यांच्या पट्ट्या एकत्र करून नवी करंजी बनवावी.
४) सर्व करंज्या बनवून घ्याव्यात. सर्व बाजूनी तूपाचा हलकासा हात फिरवावा. बेकिंग ट्रेमध्ये अल्युमिनम फॉईल पसरवून त्यावर करंज्या अरेंज कराव्यात.
५) ओव्हन २७५ F वर प्रिहीट करावे. ओव्हन प्रिहीट झाल्या कि ४० ते ४५ मिनीटे बेक करावे.
खुप जास्तवेळ बेक करू नये. यामुळे छान ब्राऊन रंग येईल, पण आत भरलेले सारण जळेल.

टीप:
१) या जरी बेक केलेल्या करंज्या असल्या तरी पूर्ण डाएट करंज्या नाहीत, कारण पिठात आपण थोडे तूप घातले आहे. जर तूप घातले नाही तर करंज्या खुपच ड्राय होतात. आणि पटकन जळतात. म्हणून यामध्ये जे तळतानाचे तेल करंजीत शोषले जाते ते अवॉइड होते.

Labels:
Baked Karanji, Baked Gujiya, Diwali Recipes, Diwali Faral

ड्रायफ्रुट करंजीचे सारण

Dry Fruit Karanji Stuffing in English

वेळ: साधारण ५० मिनीटे
यिल्ड: साधारण २ कप
bake karanji, dry fruit karanji, khobaryachya karanjya, diwali faral, साहित्य:
३/४ कप बारीक रवा
१/२ कप खवा, भाजलेला (रिकोटा चिजपासून खवा)
१/२ टिस्पून वेलची पूड
५ टेस्पून पिठीसाखर किंवा चवीनुसार
३ टिस्पून तूप
अर्धा ते पाऊण कप ड्राय फ्रुट्स, मी पुढीलप्रमाणे वापरली:
२ टेस्पून चारोळी
७ ते ८ काजू, बारीक तुकडे
७ ते ८ बदाम, पातळ चकत्या
६ ते ७ खजूर, बिया काढून बारीक चिरून घ्यावे
५ ते ६ खारका, बिया काढून बारीक चिरून घ्यावे.
१/४ कप किसलेले सुकं खोबरं, भाजून
२ टिस्पून खसखस, हलकीशी भाजून

कृती:
१) पॅनमध्ये २ टिस्पून तूप गरम करून त्यात चारोळी, काजूचे तुकडे, बदाम स्लाईसेस, चिरलेली खारीक घालून ५ ते ८ मिनीटे मध्यम आचेवर परतावेत. खजूर आधीच घालू नये. गॅसवरून पॅन बाजूला करायच्या आधी २ मिनीटे खजूर घालून परतावे. नंतर एका परातीत काढून ठेवावे.
२) त्याच पॅनमध्ये १ टिस्पून तूप गरम करून त्यात रवा गुलाबीसर रंगावर भाजावा. भाजताना आच मंद किंवा मध्यम असावी. बारीक रवा खुप मोठ्या आचेवर भाजल्यास करपू शकतो. तसेच पटकन ब्राऊन झाला तरी तो निट भाजला गेलेला नसतो. कचवट राहातो.
३) आता भाजलेला रवा, भाजलेला खवा, भाजलेली ड्राय फ्रुट्स, भाजलेली खसखस आणि वेलचीपूड घालून निट मिक्स करावे. खासकरून खवा निट मिक्स करावा कारण त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. शेवटी चवीनुसार साखर घालून मिक्स करावे. (टीप १)

टीप:
१) साखर नको असेल तर गोडपणासाठी साखरेऐवजी खजूराचे प्रमाण वाढवावे.
२) घरातील उपलब्धतेनुसार तसेच आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकतो जसे पिस्ता, अक्रोड, बेदाणे ईत्यादी.
३) या सारणापासून ड्रायफ्रुट करंजी किंवा ड्रायफ्रुट मोदक बनवू शकतो.

मूगडाळ हलवा - Moong dal halwa

Moong Dal Halwa in English

वेळ: साधारण १ ते दिड तास
२ ते ३ जणांसाठी

mung dal halwa, moong dal halwa, moog dalicha halwa, mugacha shiraसाहित्य:
३/४ कप पिवळी मूग डाळ
१/२ कप दूध, गरम
साधारण ३/४ ते १ कप पाणी (टीप ३)
१/४ ते १/२ कप खवा, भाजलेला
४ टेस्पून साजूक तूप
१/२ ते ३/४ कप साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
२ ते ३ बदाम

मूगडाळ हलव्याच्या स्टेप्सचे काही फोटो

कृती:
१) मूगडाळ मध्यम आचेवर साधारण गुलाबी-लालसर परतावे. साधारण ३० ते ३५ मिनीटे सतत ढवळावे. डाळ जळू देऊ नये किंवा खुप डार्क भाजू नये. तसेच एकसारखी भाजली गेली पाहिजे. मूगडाळ जरा कोमट झाली कि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. अगदी किंचीत भरड राहू द्यावी.
२) कढईत तूप गरम करून त्यात मूगडाळ पावडर घालून मध्यम आचेवर छान केशरी रंग येईस्तोवर भाजून घ्यावी. साधारण १० मिनीटे. नंतर १/२ कप गरम दुध थोडे थोडे घालून वाफ काढावी. बदामाचे काप घालावे. गॅस मंद करावा सर्व दुध घालावे आणि अगदी मंद आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे, तळाला डाळ चिकटू देवू नये. नंतर गरम पाण्याचा हबका मारून ढवळत राहावे. डाळ पूर्ण शिजेस्तोवर मंद आचेवर वाफ काढावी.
३) डाळीचा रवा निट शिजला आणि थोडा फुलून आला कि त्यात १/२ साखर घालावी आणि खवा घालावा, वेलचीपूड घालावी. ढवळून अजून थोडावेळ वाफ काढावी. खवा निट मिक्स झाला पाहिजे, गुठळ्या राहू देवू नये.
गरमागरम मूगडाळीचा हलवा वरती बदामाचे काप घालून सर्व्ह करावा.

टीप:
१) शेवटी आपण पाण्याचा हबका देतो त्याऐवजी दुध आणि पाण्याचे मिश्रणही वापरू शकतो.
२) वाफ व्यवस्थित काढावी, घाई करू नये. एकदा साखर घातली कि काहीच करता येत नाही, म्हणून साखर घालायच्या आधी डाळ शिजली आहे कि नाही ते तपासावे.
३) जोवर डाळ शिजत नाही तोवर थोडे थोडे पाणी किंवा दूध + पाणी घालून ढवळत राहावे. यासाठी नक्की प्रमाण नाही, गरजेनुसार अंदाजाने घालत राहावे.

मेथी शंकरपाळे - methi shankarpale

methi Shankarpale in English

साधारण २ ते ३ जणांसाठी
वेळ: ३० मिनीटे

shankarpale, crispies, teatime snack, Fried snacksसाहित्य:
३/४ कप गव्हाचे पिठ
१/४ कप मैदा
१ टेस्पून तेल
२ टिस्पून कसूरी मेथी
२ चिमटी ओवा
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मैदा, गव्हाचे पिठ आणि मिठ एकत्र करून घ्यावे. त्यात १ टेस्पून गरम तेलाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळावे.
२) कसूरी मेथी हाताने चुरडून पावडर बनवावी आणि पिठात घालावी. तसेच ओवा घालून मिक्स करावे. पाण्याने घट्ट भिजवून १५ मिनीटे झाकून ठेवावे.
३) १५ मिनीटांनी मळलेल्या पिठाचे २ समान भाग करावे. १ पिठाचा गोळा एकदम पातळ लाटावा आणि सुकू नये म्हणून त्यावरझाकण ठेवून झाकावा. नंतर दसर्‍या पिठाची पोळी लाटावी. त्याच्या वरील बाजूस तेल लावावे आणि झाकलेली पोळी त्यावर ठेवावी. वरून थोडे दाबून एकदा लाटून घ्यावी. खुप जोरात लाटू नये दोन्ही पोळ्या एकमेकांना चिकटाव्यात म्हणून लाटावे.
४) कातणाने शंकरपाळाच्या आकारात कापून तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत. एकदम सर्व न तळता ३-४ विभागात तळावेत. मोठ्या आचेवर तळले तर वरून ब्राऊन होतात पण लगेच मऊ पडतात. म्हणून मंद किंवा मध्यम आचेवर कडक होईस्तोवर तळावेत.
चहाबरोबर हे कुरकूरीत शंकरपाळे मस्तच लागतात.

Label:
crunchy snacks, shankarpale, shankarpare

मक्याचा चिवडा - Corn Flakes chivda

Corn Flakes Chivda in English

वाढणी: साधारण ८ कप

divali gifts, diwali chivda, corn flakes recipe, snacks from breakfast cereals, marathi recipe of corn chivda, Corn Cereal chiwda, Diwali Faral, ladu chivda

साहित्य:
७ कप कॉर्न फ्लेक्स (Plain) (टीप ३,४ पहा)
१/४ कप तेल
फोडणीसाठी: १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ६-७ पाने कढीपत्ता
६-७ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२/३ कप शेंगदाणे
१/४ कप बेदाणे
२ टिस्पून धणे-जिरे पूड
१ टेस्पून आमचूर पावडर
मिठ आणि साखर चवीनुसार

कृती:
१) मोठ्या पातेल्यात १/४ कप तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्यावे. शेंगदाणे एका ताटलीत काढून ठेवावेत.
२) आच मध्यम करावी. गरम तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी. कढीपत्ता घालून तडतडू द्यावा. बेदाणे घालावेत काही सेकंद परतून शेंगदाणे आणि कॉर्नफ्लेक्स घालावेत. कॉर्नफ्लेक्स ६-७ भागात घालावेत. एकदम घालू नयेत, जेणेकरून तेल सर्व कॉर्नफ्लेक्सना लागेल.
३) गॅस एकदम मंद ठेवून चिवडा निट मिक्स करून घ्यावा. आता धणे-जिरेपूड, आमचूर पावडर, मिठ आणि साखर (मी ३ टिस्पून साखर वापरली होती) घालून मिक्स करावे.
जर नॉनस्टिक भांडे वापरत असाल आणि भांड्याला कान असतील तर दोन्ही कान पकडून चिवडा सांडू न देता सावकाशपणे पाखडावा. म्हणजे सर्व जिन्नस छान मिक्स होतील.
४) गॅस बंद करून चिवडा निवू द्यावा. चिवडा निवला कि हवाबंद डब्यात भरून ठेवावा.

टीप:
१) शेंगदाण्याप्रमाणेच सुक्या खोबर्‍याचे पातळ काप आणि चण्याचे डाळं तळून चिवड्यात वापरू शकतो.
२) जर मिरच्या वापरायच्या नसतील तर फक्त लाल तिखट वापरू शकतो.
३) काही सिरीयल्स (cereal) पातळ तर काही जरा जाड असतात (मी आणलेल्या सिरीयल्स पातळ होत्या). त्यावरती तेल किती लागेल हे अवलंबून असते, म्हणून एकावेळी सर्व सिरीयल्स तेलात न घालता एकेक कप घालावेत.
४) सिरीयल्समध्ये साखरेचे प्रमाण कमीतकमी असावे, तेव्हा सिरीयल (cereal) निवडताना खोक्यावर ’Nutrition Label' वर साखरेचे प्रमाण बघुन घ्यावे. शुगर फ्रोस्टेड सिरीयल्स (Sugar Frosted Cereals) वापरू नयेत. त्यामुळे चिवडा खुप गोड होईल.

Labels:
Corn flakes chiwada, Diwali Chivda recipe, Makyacha Chivda, Makai Chivda

ओल्या नारळाच्या करंज्या - Karanji

Coconut Karanji in English

वाढणी: साधारण ११ करंज्या
वेळ: साधारण १ तास
Diwali Faral, Karanjya, Olya Naralachya Karanjya, Coconut Karanji, Gujia, how to make karanjiदिवाळीसाठी ड्रायफ्रुट बेक करंजी

साहित्य:
::::सारण::::
सव्वा कप खोवलेला ओला नारळ
पाउण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलची पूड
::::करंजी पिठ::::
पाउण कप मैदा
पाव कप रवा
१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
१/२ ते पाउण कप दूध
तळण्यासाठी तेल

कृती:
१) गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे. मिश्रण ओलसर असू नयेत नाहीतर करंज्या नरम पडतात.
२) करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजे घेत घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.
३) १५-२० मिनीटांनी थोडे दूधाचा हबका मारून पिठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.
४) करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि एक ओला, पिळून घेतलेला कपडा तयार ठेवावा.
५) करंज्या करण्यासाठी पिठाची एक गोळी निट मळून घ्यावी. गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पिठ कापून घ्यावे. [माझ्याकडे कातण नव्हते म्हणून काट्याने (Fork) कडेवरती थोडे डिझाईन केले.]
६) करंजी करून झाली कि ती ताटलीत ठेवून वरून ओला कपडा टाकून झाकावी म्हणजे करंजी सुकणार नाही. अशाप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.
७) तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

Labels:
Olya Naralachya Karanjya, Karanji recipe, Gujia Recipe, nevri, karjikayi, karanji

अनारसे - Anarse-Anarsa

Anarsa in English

Anarasa recipe, Marathi Anarsa recipe, Diwali Festival, Diwali Faral, Chakli, shankarpale, kadboli, chivda
साहित्य:
१ कप तांदूळ
१ कप किसलेला गूळ
१ चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तूप / तेल

कृती:
१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
४) ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
६) अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो (हसतो). तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पिठ ५-६ महिने सहज टिकते.
७) अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.

Labels:
Anarasa, Anarsa, marathi Recipe, Maharashtrian Diwali Faral

चकलीची भाजणी - Chakali Bhajani

Chakali Bhajani in English

वाढणी : साधारण दिड किलो

साहित्य:

दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:

१) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी वेगवेगळ्या ब्राऊन रंग येईस्तोवर भाजून घ्यावेत. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व ईतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.

Labels:
Chakali, Chakli Bhajani, Chakalichi Bhajani, Diwali Faral

चकली - Chakali

Diwali Chakali Recipe in English

वेळ: ३५ मिनीटे (भाजणी तयार असल्यास)
नग: साधारण २० ते २२ मध्यम चकल्या

diwali faral, diwali festival, chakali, murukku, chakali maharashtrian recipe, chakali bhajani
साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

चकल्या बिघडण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

Labels:
chakali, diwali faral, murukku, Maharashtrian Chakali, chakli recipe, chakali bhajani

शाही टुकडा - Shahi Tukda

Shahi Tukda (English Version)

dessert, sweets, indian sweets, cold dessert, gain weight, target weight, festival food, delicacies, Pakistani food, grocery, bread Pudding

साहित्य:
३ ब्रेडचे स्लाईस
३ कप दूध (होल मिल्क)
१/२ कप कंडेन्स मिल्क (sweetened)dessert dishes, gourmet dessert, quick and easy dessert, party sweets, dessert ideas
२ टेस्पून साखर
१ टेस्पून पिस्त्याचे काप (अनसॉल्टेड आणि रोस्टेड)
१ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर केशर
तळण्यासाठी तूप

कृती:
१) दूध मध्यम आचेवर उकळत ठेवावे. आटवून दिड ते पाऊणेदोन कप करावे. कंडेन्स मिल्क घालून ५ मिनीटे उकळवावे. २ टेस्पून साखर घालावी. गरजेनुसार साखर कमी किंवा जास्त करावी. यात वेलचीपूड आणि केशर घालावे. पिस्त्याचे काप घालावेत, थोडे सजावटीसाठी ठेवावेत.
२) ब्रेड स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात. ब्रेडचे त्रिकोणी किंवा आवडत्या आकारात तुकडे करावे. तुपात तळून किंवा मंद आचेवर शालो फ्राय करून घ्यावेत. ब्रेडचे स्लाईस कुरकूरीत आणि बाहेरून थोडे ब्राउन करून घ्यावेत.
३) सर्व्हींग प्लेटमध्ये तळलेले ब्रेडचे स्लाईस ठेवावेत त्यावर आटवलेले दूध घालून आणि फ्रिजमध्ये थंड करत ठेवावेत. थंड झाल्यावर दुध छान घट्ट होते. वरून पिस्त्याचे काप घालून सजवावे.

टीप:
१) ब्रेडचे स्लाईस तेलात शालोफ्राय केलेले चालतात. तळून झाल्यावर यातील सर्व अधिकचे तेल निघून गेल पाहिजे नाहीतर खाताना तेलाची चव लागते. त्यासाठी तळल्यावर ब्रेडचे स्लाईस काहीवेळ पेपर टॉवेलवर वर काढून ठेवावेत.

Labels:
Shahi Tukada, recipe for Shahi Tukda, Indian Shahi Tukda, Indian Sweets recipe, Dessert