Spinach Rice in Englishवेळ: ३० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:३/४ कप बासमती तांदूळ
१ ते दिड कप बारीक चिरलेली पालकाची पाने + १/२ कप पाणी
३/४ कप गरम पाणी
१ टेस्पून बटर
१ टिस्पून बारीक चिरलेले आले
१ टिस्पून बारीक चिरलेले लसूण
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ लहान हिरवी मिरची
आख्खे गरम मसाले - २ तमालप्रत्र, १ हिरवी वेलची, २ लवंगा
चवीपुरते मिठ
कृती:१) तांदूळ साध्या पाण्यात १० मिनीटे भिजवून ठेवावा. १० मिनीटांनी पाणी काढून टाकावे. आणि हा तांदूळ १० मिनीटे निथळत ठेवावा.
२) १/२ कप साधं पाणी आणि पालक एकत्र करून बारीक प्युरी करून घ्यावी.
३) नॉनस्टीक पॅनमध्ये १ टेस्पून बटर किंवा तूप गरम करावे. त्यात जिरे आणि आख्खे मसाले घालावे. ५ ते १० सेकंद परतून आले-लसूण आणि मिरची घालावी.
४) निथळत ठेवलेला तांदूळ आता घालून व्यवस्थित कोरडा होईस्तोवर परतावा. सतत परतत राहा म्हणजे तांदूळ जळणार नाही. तांदूळ पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि व्यवस्थित भाजला गेला पाहिजे.
५) ३/४ कप गरम पाणी, मिठ आणि पालकाची प्युरी घालून मोठ्या आचेवर भात शिजू द्यावा. भाताच्या पृष्ठभागावर (सरफेस) पाणी दिसायचे बंद झाले कि लगेच आच मिडीयम आणि लो च्यामध्यावर ठेवावी तसेच पॅनवर झाकण ठेवावे. साधारण १० मिनीटे वाफ काढावी.
भात तयार झाला कि काट्याने (fork) हलकेच मोकळा करून घ्यावा. गरम भात रायते आणि पापडाबरोबर सर्व्ह करावा.
टीपा:१) भात अधिक पौष्टिक बनवण्यासाठी मटार, गाजर, फरसबी अशा भाज्याही घालू शकतो.
२) तांदूळ चांगला भाजला गेल्याने भात मोकळा होतो. तसेच भात मोकळा होण्यासाठी गरम पाणी वापरावे आणि स्टेप क्र. ५ चे नक्की अवलंबन करावे.
३) लहान मुलांना हा भात नक्की आवडेल. वाटल्यास मिरची घालू नये.