कसेडिया - Quesadilla Indian

Chakali's Version of Quesadilla

कसेडिया हा मेक्सिकन पदार्थ आहे. यामध्ये मुख्यतः चीजचा जास्त वापर केला जातो. Quesadilla हा शब्द Queso या स्पॅनिश शब्दावरून तयार झाला आहे. स्पॅनिशमध्ये Queso म्हणजे चीज.
मक्याच्या किंवा गव्हाच्या पोळ्यांमध्ये {ज्याला Tortilla असे म्हटले जाते} आवडत असलेल्या पदार्थांचे स्टफिंग करून हा पदार्थ बनवला जातो. स्टफिंग मध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा नॉन-वेजिटेरियन लोकांना खिम्याचा ही वापर करता येतो. मी हाच पदार्थ थोडा भारतीय लूक देऊन बनवला आणि मला तो खूप आवडला. त्याची कृती खालीलप्रमाणे :

पोळ्या/ चपात्या


साहित्य

तयार कसेडिया

साहित्य :
२ छोट्या चपात्या/ फुलके (भाजून)
१ छोटा कांदा
१ छोटा टोमॅटो
अर्धी भोपळी मिरची
पाती कांदा
१ हिरवी मिरची
बटर
किसलेले चीज (मेक्सिकन चीज ब्लेण्ड मिळाल्यास उत्तम)
चाट मसाला
मीठ
ग्रील करण्यासाठी सॅण्डविच टोस्टर

कृती :
१) प्रथम कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची उभी चिरून घ्यावी. पाती कांद्याची फक्त पात घेऊन ती एकदम बारीक चिरावी.
२) दोन पैकी एका पोळीला एका बाजूने थोडे बटर लावून घ्यावे, त्यावर थोडे मीठ पेरावे.
३) प्रत्येक पोळीवर चिरलेला कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची आणि पाती कांदा घालावा. हिरवी मिरची बारीक चिरून पोळीवर घालावी. वरुन चाट मसाला आणि मीठ घालावे.
४) शेवटी थोडे किसलेले चीज घालावे. दुसरी पोळी कांदा टोमॅटो घातलेल्या पोळीवर ठेवावी.
५) वरुन हलक्या हाताने थोडा दाब द्यावा. आणि टोस्टरमध्ये घालावे. कसेडीया टोस्टरमध्ये चांगला ग्रील करून घ्यावा. त्यावर थोडे बटर लावावे आणि थोडा चाट मसाला लावावा. आणि गरम गरम खावा.

टीप :
१) जर सॅण्डविच टोस्टर उपलब्ध नसेल तर कसेडीया तव्यावरही करू शकतो.
२) आवडीनुसार मश्रुम, गाजर व इतर भाज्या घालू शकतो.
३) आदल्या दिवशीच्या पोळ्या संपवण्यासाठी कसेडीया हा उत्तम पर्याय आहे.

चकली

No comments:

Post a Comment