Batata Bhaji in Enlgish
साधारण २ प्लेट
वेळ: २० मिनीटे
साहित्य:
२ मध्यम बटाटे
१/२ कप बेसन
३ टेस्पून पाणी
१ टेस्पून तांदूळ पिठ
चिमूटभर खायचा सोडा
१/२ टिस्पून जिरे
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) बटाटे सोलून पातळ चकत्या करून साध्या पाण्यात साधारण १५ मिनीटे घालून ठेवावेत. जर जमत असेल तर भजी बनवायच्या ३-४ तास आधी बटाट्याच्या कापट्या पाण्यात घालून ठेवाव्यात. यामुळे बटाट्याचा स्टार्च काहीप्रमाणात कमी होतो.
२) बटाट्याच्या चकत्या पाण्यात भिजताहेत तोवर एका मध्यम वाडग्यात बेसन तांदूळ पिठ एकत्र करून त्यात ३ ते ४ टेस्पून पाणी घालून पिठ भिजवावे. त्यात जिरे, मिठ आणि सोडा घालून मिक्स करावे.
३) तेल तापत ठेवावे. बटाट्याच्या चकत्या पाण्यातून २ मिनीटे उपसून काढाव्यात, म्हणजे बटाट्यावरचे एक्स्ट्रा पाणी भिजवलेल्या पिठात जाऊन पिठ अजून पातळ होणार नाही. तेल तापले कि बटाट्याच्या चकत्या पिठात बुडवून भजी तळून काढाव्यात.
गरमागरम भजी लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह कराव्यात.
तसेच लादीपाव असेल तर हिरवी चटणी, चिंचेची आंबट-गोड चटणी आणि लसणीचे तिखट घालून भजीपावही सुंदर लागतो.
टीप:
१) भजीसाठीचे पिठ घट्ट नसावे. जर पिठ घट्ट असेल तर भजी कुरकूरीत होत नाहीत आणि चवही चांगली लागत नाही.
२) आवडीनुसार थोडे लाल तिखट, १ टेस्पून चिरलेली कोथिंबीर, आणि चिमूटभर ओवा भजीच्या पिठात घालावा.
३) कदाचित तुम्हाला भिजवलेले पिठ कमी वाटेल पण मध्यम आकाराच्या २ बटाट्यांना १/२ कप बेसन आणि १ चमचा तांदूळ पिठ व्यवस्थित पुरते. जास्त पिठ भिजवले गेले तर भजी तळून ते पिठ परत उरते आणि मग त्यासाठी अजून काहीतरी पदार्थ जबरदस्ती बनवावा लागतो.
Label:
Batata Bhaji, Batata bhajji, aloo pakoda
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment