१२ ते १५ लाडू, मध्यम आकाराचे
वेळ: ३० ते ४० मिनीटे (पाक मुरायला कमीतकमी २० मिनीटे आणि जास्तीत जास्त २ तासही लागू शकतात)
१ कप बारीक रवा
१/२ कप बेसन
४ टेस्पून तूप
१ कप साखर
१/२ कप पाणी
१/२ टिस्पून वेलचीपूड
बदाम काजूचे पातळ काप
कृती:
१) बारीक रवा मध्यम आचेवर कोरडाच भाजावा. गुलाबीसर रंग येऊ द्यावा. तसेच भाजताना सतत कालथ्याने उलथत राहावा. मोठ्या आचेवर भाजल्यास रंग पटकन येईल पण रवा कच्चाच राहिल.
२) रवा भाजला कि परातीत काढून ठेवावा. त्याच कढईत तूप घालून, मध्यम आचेवर बेसन खमंग भाजून घ्यावे. बदाम काजूचे काप घालावे.
३) दुसर्या पातेल्यात १ कप साखर आणि १/२ कप पाणी घालून एकतारी पाक करावा. एकतारी पाक करण्यासाठी साखर पाणी एकत्र करावा एक उकळी येऊ द्यावी. उकळी आली कि मिश्रण फेसाळेल आणि फेस कमी झाला कि अर्ध्या मिनीटात लगेच गॅस बंद करावा आणि हा पाक रवा आणि बेसनाच्या मिश्रणात घालावा. कालथ्याने ढवळावे आणि झाकून ठेवावे. १५-२० मिनीटांनी मिश्रण ढवळावे. वेलचीपूड घालावी. हळू हळू मिश्रण आळेल आणि लाडू वळण्याइतपत घट्ट झाले कि लगेच लाडू वळावेत.
टीप:
१) पाक व्यवस्थित जमला पाहिजे, पाक गरजेपेक्षा थोडाजरी दाट झाला कि मिश्रण कोरडे होते. मी लाडू बनवले तेव्हा मिश्रण पटकन आळले आणि जरा कोरडे झाले तेव्हा मी थोडे दुध घालून लाडू वळले. छान झाले आणि ८ दिवस टिकलेसुद्धा. जर दमट हवेच्या ठिकाणी राहात असाल आणि लाडू वळताना दुध घातले असेल तर शक्यतो लाडू बनवल्यावर दुसर्या दिवशी फ्रिजमध्ये ठेवावेत.
No comments:
Post a Comment