वेळ: साधारण ५० मिनीटे
यिल्ड: साधारण २ कप
३/४ कप बारीक रवा
१/२ कप खवा, भाजलेला (रिकोटा चिजपासून खवा)
१/२ टिस्पून वेलची पूड
५ टेस्पून पिठीसाखर किंवा चवीनुसार
३ टिस्पून तूप
अर्धा ते पाऊण कप ड्राय फ्रुट्स, मी पुढीलप्रमाणे वापरली:
२ टेस्पून चारोळी
७ ते ८ काजू, बारीक तुकडे
७ ते ८ बदाम, पातळ चकत्या
६ ते ७ खजूर, बिया काढून बारीक चिरून घ्यावे
५ ते ६ खारका, बिया काढून बारीक चिरून घ्यावे.
१/४ कप किसलेले सुकं खोबरं, भाजून
२ टिस्पून खसखस, हलकीशी भाजून
कृती:
१) पॅनमध्ये २ टिस्पून तूप गरम करून त्यात चारोळी, काजूचे तुकडे, बदाम स्लाईसेस, चिरलेली खारीक घालून ५ ते ८ मिनीटे मध्यम आचेवर परतावेत. खजूर आधीच घालू नये. गॅसवरून पॅन बाजूला करायच्या आधी २ मिनीटे खजूर घालून परतावे. नंतर एका परातीत काढून ठेवावे.
२) त्याच पॅनमध्ये १ टिस्पून तूप गरम करून त्यात रवा गुलाबीसर रंगावर भाजावा. भाजताना आच मंद किंवा मध्यम असावी. बारीक रवा खुप मोठ्या आचेवर भाजल्यास करपू शकतो. तसेच पटकन ब्राऊन झाला तरी तो निट भाजला गेलेला नसतो. कचवट राहातो.
३) आता भाजलेला रवा, भाजलेला खवा, भाजलेली ड्राय फ्रुट्स, भाजलेली खसखस आणि वेलचीपूड घालून निट मिक्स करावे. खासकरून खवा निट मिक्स करावा कारण त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. शेवटी चवीनुसार साखर घालून मिक्स करावे. (टीप १)
टीप:
१) साखर नको असेल तर गोडपणासाठी साखरेऐवजी खजूराचे प्रमाण वाढवावे.
२) घरातील उपलब्धतेनुसार तसेच आवडीनुसार कोणताही सुकामेवा वापरू शकतो जसे पिस्ता, अक्रोड, बेदाणे ईत्यादी.
३) या सारणापासून ड्रायफ्रुट करंजी किंवा ड्रायफ्रुट मोदक बनवू शकतो.
No comments:
Post a Comment