२ ते ३ जणांसाठी
वेळ: २० ते ३० मिनीटे
५-६ लहान जांभळी वांगी (टीप १ आणि ३)
२ मध्यम बटाटे
१ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य: १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट, २ कढीपत्ता पाने
१ ते दिड टेस्पून दाण्याचा कूट
१ टिस्पून काळा मसाला
१ टेस्पून चिंचेचा कोळ
१ टेस्पून गूळ
चवीपुरते मिठ
१ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) वांग्याची देठं काढून टाकावीत. आणि प्रत्येक वांग्याचे ८ लहान तुकडे करावे. गार पाण्यात घालून ठेवावेत. बटाटे सोलून त्याचे मध्यम चौकोनी तुकडे करावेत आणि दुसर्या गार पाण्याच्या वाडग्यात ठेवावे.
२) कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी पाण्यातून उपसून काढाव्यात आणि फोडणीत घालाव्यात. २ ते ३ मिनीटे व्यवस्थित परतून घ्याव्यात. थोडावेळ वाफ काढावी.
३) त्यात वांग्याच्या फोडी घालाव्यात. त्यात थोडे पाणी घालून मंद आचेवर वाफ काढावी. त्यात मिठ, चिंचेचा कोळ, आणि काळा मसाला घालून बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजू द्याव्यात. गरज लागल्यास थोडे पाणी घालावे.
४) बटाटा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या नंतरच त्यात गूळ घालावा (टीप २). दाण्याचा कूट घालून उकळी काढावी.
गरमागरम रस्सा पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावा.
टीप:
१) जर लहान वांगी नाही मिळाली तर १ चायनीज वांगे वापरावे किंवा अर्धे मोठे वांगे (भरीताचे) वापरावे.
२) बटाटा आणि वांगे शिजल्यावरच त्यात गूळ घालावा, जर अगोदरच गूळ घातला तर बटाटा आणि वांगे आवठरतात आणि पटकन शिजत नाहीत.
३) कधी कधी मोठी वांगी घशाला खवखवतात, अशावेळी छोटी वांगी बरी पडतात.
No comments:
Post a Comment