वेळ: साधारण १ ते दिड तास
२ ते ३ जणांसाठी
३/४ कप पिवळी मूग डाळ
१/२ कप दूध, गरम
साधारण ३/४ ते १ कप पाणी (टीप ३)
१/४ ते १/२ कप खवा, भाजलेला
४ टेस्पून साजूक तूप
१/२ ते ३/४ कप साखर
१/२ टिस्पून वेलचीपूड
२ ते ३ बदाम
मूगडाळ हलव्याच्या स्टेप्सचे काही फोटो
कृती:
१) मूगडाळ मध्यम आचेवर साधारण गुलाबी-लालसर परतावे. साधारण ३० ते ३५ मिनीटे सतत ढवळावे. डाळ जळू देऊ नये किंवा खुप डार्क भाजू नये. तसेच एकसारखी भाजली गेली पाहिजे. मूगडाळ जरा कोमट झाली कि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. अगदी किंचीत भरड राहू द्यावी.
२) कढईत तूप गरम करून त्यात मूगडाळ पावडर घालून मध्यम आचेवर छान केशरी रंग येईस्तोवर भाजून घ्यावी. साधारण १० मिनीटे. नंतर १/२ कप गरम दुध थोडे थोडे घालून वाफ काढावी. बदामाचे काप घालावे. गॅस मंद करावा सर्व दुध घालावे आणि अगदी मंद आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे, तळाला डाळ चिकटू देवू नये. नंतर गरम पाण्याचा हबका मारून ढवळत राहावे. डाळ पूर्ण शिजेस्तोवर मंद आचेवर वाफ काढावी.
३) डाळीचा रवा निट शिजला आणि थोडा फुलून आला कि त्यात १/२ साखर घालावी आणि खवा घालावा, वेलचीपूड घालावी. ढवळून अजून थोडावेळ वाफ काढावी. खवा निट मिक्स झाला पाहिजे, गुठळ्या राहू देवू नये.
गरमागरम मूगडाळीचा हलवा वरती बदामाचे काप घालून सर्व्ह करावा.
टीप:
१) शेवटी आपण पाण्याचा हबका देतो त्याऐवजी दुध आणि पाण्याचे मिश्रणही वापरू शकतो.
२) वाफ व्यवस्थित काढावी, घाई करू नये. एकदा साखर घातली कि काहीच करता येत नाही, म्हणून साखर घालायच्या आधी डाळ शिजली आहे कि नाही ते तपासावे.
३) जोवर डाळ शिजत नाही तोवर थोडे थोडे पाणी किंवा दूध + पाणी घालून ढवळत राहावे. यासाठी नक्की प्रमाण नाही, गरजेनुसार अंदाजाने घालत राहावे.
No comments:
Post a Comment