पाणीपुरीचे पाणी - Panipuriche Pani

Panipuriche Pani in English

पाणीपुरीचे पाणी आणि फिलिंग बर्‍याच प्रकारे करता येते, माझ्या आवडीचे काही प्रकार खाली देत आहे.

इतर संबंधित पाककृती:
पाणीपुरीच्या पुर्‍या
पाणीपुरीचे स्टफिंग

पाणीपुरीचे पाणी - १
साहित्य:
अर्धी कप चिंच
४-५ टेस्पून किसलेला गूळ
१०-१२ खजुर
काळे मिठ
६-७ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
२ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धनेपूड
मीठ
कृती:
१) चिंच पाण्यात भिजत घालून चिंचेचा कोळ करावा. खजूर ४-५ तास कोमट पाण्यात भिजवावे. बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावे.
२) हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करावी.
३) ४-५ भांडी पाण्यात चिंचेचा कोळ, गूळ, खजूराची पेस्ट, काळे मिठ, मिरचीची चटणी, जिरेपूड, धनेपूड, मीठ सर्व मिक्स करावे.

पाणीपुरीचे पाणी - २
साहित्य:
आंबट-तिखट पाणी:
अर्धी कप चिंच
१/२ टिस्पून किसलेले आले
८-१० पुदिन्याची पाने बारीक चिरून
चवीनुसार लाल तिखट/ हिरव्या मिरच्यांचा ठेचा
चाट मसाला
काळे मिठ
मीठ
गोड चटणी:
अर्धी वाटी गूळ
१०-१२ खजूर

कृती:
१) चिंचेचा कोळ करून घ्यावा. ३-४ भांडी पाण्यात चिंचेचा कोळ, लाल तिखट, चाट मसाला,आले, काळे मिठ आणि साधे मीठ घालून पाणी तयार करून घ्यावे.
२) खजूर कोमट पाण्यात ४-५ तास भिजत घालावे. खजूर मऊ झाले त्यातील बिया काढून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. १ कप पाण्यात गूळ आणि खजूराची पेस्ट एकत्र करून घट्ट चटणी करून घ्यावी.
३) पाणी पुरी बनवताना आधी गोड चटणी आणि मग चिंचेचे पाणी घालावे.

पाणीपुरीचे पाणी - ३

पाणीपुरीचा मसाला वापरूनही तिखट पाणी बनवता येते. तसेच वेगळ्याप्रकारे गोड पाण्याची कृतीही दिलेली आहे.
गोड चटणी
साहित्य:
१/४ कप चिंच (बिया काढून)
५ ते ६ टेस्पून खजूर पेस्ट (टीप १)
१/२ कप किसलेला गूळ
साधारण २ कप पाणी (टीप ३)
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून मिठ
कृती:
१) चिंच १ कप गरम पाण्यात भिजत ठेवावी. पातेल्यावर १५ मिनीटे झाकण ठेवून द्यावे. मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी आणि गाळण्याने व्यवस्थित गाळून चोथा टाकून द्यावा आणि कोळ ठेवावा.
२) खजूराची पेस्ट चिंचेच्या कोळात कुस्करून घ्यावी. तसेच गूळ, धणे-जिरेपूड, आणि किंचीत मिठ घालून मिक्स करावे. वाटल्यास चटणी मिक्सरमध्ये एकदा फिरवावी म्हणजे सर्व जिन्नस मिळून येतील.
टीप:
१) मी रेडीमेड खजूराची पेस्ट वापरली होती. यालाच ’बेकिंग डेट्स’ असे म्हणतात आणि आयताकृती पाकिटात इंडीयन स्टोअरमध्ये मिळतात. या पेस्टचा फायदा म्हणजे आख्ख्या खजूराप्रमाणे भिजवून ठेवावे लागत नाही. जर तुम्हाला साधे खजूर वापरायचे असतील तर त्यातील बिया काढून टाकाव्यात. लहान तुकडे करून १/२ कप कोमट पाण्यात १५ मिनीटे भिजवावे आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.
२) गूळाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे.
३) पाणीपुरीत काही जणांना घट्ट तर काही जणांना पातळ चटणी आवडते. त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमीजास्त करावे.

तिखट पाणी
साहित्य:
२ टेस्पून पाणीपुरी मसाला
१/२ कप कोथिंबीर
१२ ते १५ पुदीना पाने
५ ते ६ हिरव्या मिरच्या
७०० ते ८०० मिली थंड पाणी (३ ते ४ कप)
मिठ चवीनुसार
१/२ टिस्पून काळं मिठ (ऐच्छिक)
१/२ टिस्पून आमचूर पावडर (ऐच्छिक)
कृती:
१) कोथिंबीर, पुदीना पाने, आणि हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. थंड पाणी एका पातेल्यात घालून त्यामध्ये हि पेस्ट घालावी.
२) याच पाण्यात पाणीपूरी मसाला, आमचूर पावडर, थोडे काळं मिठ आणि लागल्यास थोडे साधे मिठ घालून व्यवस्थित ढवळावे. थंड पाणी हवे असल्यास सर्व्ह करण्यापूर्वी साधारण तासभर फ्रिजमध्ये गार करावे.
टीप:
१) पाणीपुरी मसाल्यात काळे मिठ आणि आमचूर पावडर आधीपासूनच असते. त्याप्रमाणे चव घेऊनच हे जिन्नस घालावे. परंतु, काळे मिठ आणि आमचूर पावडर घातल्याने पाणीपुरीच्या पाण्याचा फ्लेवर खुप छान लागतो. आमचूर पावडरने आंबटपणाही छान येतो.
२) कमी तिखट पाणी बनवायचे असल्यास हिरव्या मिरच्या गरजेनुसार वापराव्यात.

Labels:
Pani puri, Panipuriche pani, Golguppa, Panipuri, Chat food

No comments:

Post a Comment