वेज मंचुरीयन - Veg Manchurian

Veg Manchurian (English Version)

खाली दिलेली कृती "Tried & Tested" आहे. सुरुवातीचे २-३ प्रयत्न फसल्यावर यशस्वी झालेला प्रयोग :-).नक्की करून बघा आणि सांगा मंचुरीयन कसे झाले ते !!

veg manchurian recipe, manchurian recipe, vegetable manchurian, veggie manchurian, chinese recipe, chinese manchurian recipe
साहित्य:
:मंचुरीयन बॉलसाठी:
१ कप किसलेला कोबी
१/२ कप किसलेले गाजर
५-६ फरसबी अगदी बारीक चिरून
पाऊण कप पाती कांदयाच्या पाती बारीक चिरून
अर्धा कप बारीक चिरलेली भोपळी मिरची
३ टेस्पून कॉर्न स्टार्च
१ मिरची
मिठ
तळण्यासाठी तेल
:मंचुरीयन सॉससाठी:
२-३ हिरव्या मिरच्या
१/२ टेस्पून किसलेले आले
४-५ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
२ टिस्पून चमचे तेल
२ टेस्पून सोयासॉस
१ टेस्पून व्हिनेगर
१ टिस्पून साखर
१ ते दिड कप वेजिटेबल स्टॉक
मिठ

कृती:
१) सर्वात आधी मंचुरीयन बॉल्स बनवून घ्यावे. त्यासाठी सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र कराव्यात. त्याला चवीप्रमाणे मिठ चोळावे, मिरची बारीक चिरून घालावी. नंतर त्यात कॉर्न स्टार्च घालावा. व्यवस्थित मिक्स करावे. मिश्रण घट्ट आणि चिकटसर झाले पाहिजे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल व्यवस्थित तापले कि कालवलेल्या मिश्रणाचे सुपारीएवढे बोंडे तेलात सोडावे. चांगले ब्राऊन रंगाचे होईस्तोवर तळावे. बोंड्यांचा आकार लहानच ठेवावा नाहीतर आतून कच्चे राहण्याचा संभव असतो.
३) मंचुरीयन सॉससाठी वेजिटेबल स्टॉक वापरल्यास छान चव येते. मंचुरीयन सॉससाठी एखादे पसरट फ्राईंग पॅन वापरावे.
फ्राईंग पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करावे. त्यात चिरलेली मिरची, चिरलेली लसूण-आले घालावे. १/२ मिनीट परतून थोडी साखर घालावी, मग सोयासॉस घालावा, लगेच १ कप वेजिटेबल स्टॉक घालावा. वेजिटेबल स्टॉकला उकळी येईस्तोवर १ चमचा कॉर्न स्टार्च अर्धी वाटी पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून ठेवावे. वेजिटेबल स्टॉकला उकळी आली कि कॉर्न स्टार्चचे पाणी एकदा ढवळून हळूहळू स्टॉकमध्ये घालावे. त्यामुळे मंचुरीयन सॉसला घट्टपणा येतो.
४) नंतर त्यात मीठ, व्हिनेगर घालून ढवळावे. चव बघून काही कमी असेल तर ते घालून सॉस तयार करावा. मंद आचेवर सॉसमध्ये तयार बॉल्स घालावे, निट मिक्स करावे. गार्निशिंगसाठी थोडा बारीक चिरलेला पाती कांदा, बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि कोबी घालावी.

टीप:
१) मिश्रणात कॉर्न स्टार्च असल्याने तो हाताला चिकटतो, त्यासाठी तळताना बाजूला एका पसरट भांड्यात हात ओले करण्यासाठी पाणी ठेवावे, हात जरा ओले असले कि मिश्रण हाताला चिकटत नाही.
२) मंचुरीयन सॉस बनवताना दिलेल्या सिक्वेन्सप्रमाणेच गोष्टी घालाव्यात नाहीतर चव परफेक्ट होणार नाही.

Labels:
Manchurian Sauce, Veg Manchurian, Dry Machurian, Manchurian recipe, Indo Chinese recipe

No comments:

Post a Comment