Pedhe in English
पेढा बनवायला खवा लागतो. जर तयार खवा उपलब्ध असेल तर उत्तमच, पण जर उपलब्ध नसेल तर रिकोटा चिजपासून खवा बनवता येतो. खाली दिलेली पेढ्याची कृती हि रिकोटा चिजपासून खवा आणि त्या खव्यापासून पेढे कसे बनवावेत याची आहे.
साहित्य:
४२५ ग्राम रिकोटा चिज अथवा २०० ग्राम खवा
१ चमचा साजूक तूप
१ कप दूध
१०० ग्राम साखर
२ चिमूट केशर
१ लहान चमचा वेलची पावडर
बारीक चिरलेले बदाम, पिस्ता
कृती:
१) सर्वात प्रथम रिकोटा चिजपासून खवा बनवून घ्यावा लागतो. त्यासाठी नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये तूप घालावे, तूप पातळ झाले कि रिकोटा चिज घालावे. अगदी मध्यम आचेवर परतावे. सुरूवातीला चिज पातळ होते. रिकोटा चिज सारखे ढवळत राहावे, तळाला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. हळूहळू रिकोटा चिज घट्ट होवून त्याचा खवा तयार होतो. या कृतीत रिकोटा चिज आळत जाते. मी खवा केला तेव्हा ४२५ ग्राम रिकोटा चिजचा २०० ग्राम खवा तयार झाला होता. या कृतीला अंदाजे २५-३० मिनीटांचा कालावधी लागतो. खवा थंड झाला कि मळून घ्यावा.
२) पेढा करण्याआधी दूधात केशर मिक्स करून ठेवावे. तयार खवा नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये घ्यावा त्यात साखर घालावी. मध्यम आचेवर ढवळत राहावे. ५-७ मिनीटात साखर आणि खवा यांचे पातळसर मिश्रण तयार होते. त्यात दूध घालावे. आणि मिडीयम लो गॅसवर सारखे ढवळत राहावे. मिश्रण जरा घट्ट झाले त्यात वेलची पावडर घालावी. जवळ जवळ २८-३० मिनीटांनी पेढ्यांसाठी घट्ट गोळा तयार होतो.
३) मिश्रण अगदी थोडा वेळ निवळू द्यावे, शक्यतो मिश्रण गरम असतानाच पेढे वळावेत. हातांच्या तळव्यांना थोडे तूप लावून पेढे वळावेत. सजावटीसाठी पेढ्यांना वरती बदाम, पिस्त्याचे काप लावावेत.
टीप:
१) पेढे जर पिवळ्या रंगाचे हवे असतील त्यात खायचा रंग घालावा.
२) पेढे ५-६ दिवस फ्रिजमध्ये व्यवस्थित टिकतात. पेढे बनवल्यावर दोन एक दिवसांनी पेढ्यांचा गोडपणा जरा वाढतो, त्याप्रमाणे साखर कमीजास्त करावी.
Labels:
Pedha, Indian Sweet Recipe, sweets to India, Mithai, Indian Desserts recipe
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment